मुरलीधर भवार लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : केडीएमसी हद्दीत मार्चपासून सुरू झालेला कोरोनाचा कहर ऑक्टोबरमध्ये दिवाळीपूर्वी कमी होऊ लागला. ही एक समाधानकारक बाब पाहता आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्रा येथील कोविड सेंटरमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी दिवाळी साजरी केली.
कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी दिवसरात्र झटणारे डॉक्टर, नर्स, वाॅर्डबॉय, कर्मचारी आणि अधिकारी यांच्या पाठीवर त्यांनी कौतुकाची थाप दिली. या त्यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू देत त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला. आयुक्तांनी अशा प्रकारचा कार्यक्रम साजरा केल्याने दिवाळीत सर्व कर्मचारी व रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.सर्व जण आपल्या घरात दिवाळी साजरी करणार होते. मात्र, कोरोना सेंटरमध्ये दिवाळी साजरी करण्याचा आणि कर्तव्य बजावताना वेगळा आनंद डॉक्टर आणि नर्स यांना होता. त्याहीपेक्षा जास्त आनंद कोरोना सेंटरमधील रुग्णांना झाला होता. कारण, ते दिवाळीत घरी जाणार नव्हते. मात्र, या कार्यक्रमामुळे त्यांनाही दिवाळी घरीच साजरी करीत असल्याची जाणीव झाली.
संस्मरणीय दिवाळी दिवाळीत आम्ही कोविड सेंटरमध्ये उपचार घेत होतो. धनत्रयोदशीच्या दिवशी या ठिकाणी आमच्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि नर्सचा सत्कार करण्यात आला. ही आमच्या आयुष्यातील एक आगळीवेगळी आणि संस्मरणीय दिवाळी ठरली, असे रुग्ण पुषपा म्हात्रे यांनी सांगितले.
कर्तव्य बजावताना सेंटरमध्ये ६७ डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांसह अधिकारी होते. मात्र, धनत्रयोदशीच्या दिवशी आमच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळाली. ही बाब आमच्यासाठी मोठी होती. - डॉ. दीपाली मोरे, वैद्यकीय अधिकारी, टाटा आमंत्रा