- मयुरी चव्हाण
कल्याण- कल्याणडोंबिवली महानगरपालिका हद्दीत एकूण 5 लाख 78 हजार नागरीकांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे केडीएमकडून सांगण्यात आले आहे. मात्र केडीएमसी हद्दीत आतापर्यंत 1 लाख 52 हजार नागरिकांचेच लसीचे दोन्ही डोस घेऊन पूर्ण झाले आहे. एकूण 13 लाख नागरीकांचे लसीकरण करण्याचे केडीएमसीचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे अजूनही 11 लाख 48 हजार नागरीक लसीचे दोन्ही डोस घ्यायचे बाकी आहेत.
लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरीकांना लोकलने प्रवास करण्याची मुभा राज्य सरकारने दिली आहे. मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे आणि उत्पन्न मिळवून देणारे रेल्वे स्थानक म्हणून डोंबिवली रेल्वे स्थानक ओळखले जाते. मात्र लसीकरणाची सद्यस्थिती पाहता लाखो चाकरमान्यांचा रेल्वे प्रवास कठीण आहे हे निश्चित झाले आहे.
सण 2011 च्या जनगणनेनुसार कल्याण डोंबिवली शहराची लोकसंख्या साधारण 12 लाख 50 हजार इतकी होती. 2021 साली साधारण ही लोकसंख्या 15 लाखांच्या वर गेल्याचा अंदाज आहे. केडीएमसी हद्दीत एकूण 13 लाख नागरीकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे केडीएमसीचे उद्दिष्ट आहे. यामधून लहान वयोगटाला वगळण्यात आले आहे. केडीएमसी क्षेत्रात आत्तापर्यंत 5 लाख 78 हजार जणांचे लसीकरण झाले असून त्यामध्ये सुमारे 4 लाख 26 हजार नागरिकांचा पहिला तर 1 लाख 52 हजार नागरिकांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. त्यामुळे एकूण 11 लाख 48 हजार नागरीक अजून दोन्ही डोस घ्यायचे बाकी आहेत. साधारणपणे जानेवारी महिन्यात कल्याण डोंबिवली क्षेत्रातील लसीकरणाला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांत लसींच्या तुटवड्याअभावी वारंवार केडीएमसीची लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. मात्र, खाजगी रुग्णालयात लसींचा मुबलक पुरवठा असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एकीकडे राज्य सरकारने दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची मुभा दिली आहे. एक तर तुटवड्याअभावी लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहे तर दुसरीकडे बोटावर मोजण्याइतकेच लसिकरण केंद्र सुरू असल्याने नागरिकांची केंद्रांवर मोठी गर्दी होताना दिसत आहे.
मंगळवारी सुद्धा पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर गर्दी उसळली होती. त्यामुळे येणाऱ्या काळात विशेषतः लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागणार हे अटळ आहे. कल्याण डोंबिवली शहरात मध्यमवर्गीय, सुशिक्षित नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. येथील चाकरमानी कामानिमित्त मुंबई व इतर उपनगरांमध्ये येजा करतात. परिणामी लोकल प्रवास करता यावा म्हणून नाईलाजाने दुसऱ्या डोससाठी शुल्क भरून नागरिकांना खाजगी रुग्णालयाची पायरी चढावी लागली तर आश्चर्य वाटू नये.
एकुण 13 लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये लहान वयोगटाचा समावेश नाही. -डॉ संदीप निंबाळकर, आर .सी. एच.ऑफीसर, केडीएमसी.