प्रशांत माने ,कल्याण: थर्टी फर्स्टला दारू पिऊन वाहन चालवू नका, असे वारंवार आवाहन करूनही त्याकडे दुर्लक्ष करून बिनदिक्कतपणे दारू पिऊन वाहन चालविणा-या ५५ मद्यपी चालकांवर कारवाई केली. रविवार संध्याकाळपासून सुरू झालेली कारवाई सोमवारी पहाटेपर्यंत चालू होती. दारू पिऊन वाहन चालविणा-या ५५ वाहनचालकांसह इतर वाहतुकीचे नियम मोडणा-या ९३७ वाहनचालकांकडुन एकुण ८ लाख ६१ हजार ६५० रूपयांचा दंड आकारण्यात आला.
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर २६ डिसेंबरपासूनच वाहतुक पोलिसांनी ऑल आऊट ऑपरेशन हाती घेतले होते. यात ड्रंक ड्राइव्हच्या केसेस करण्याबरोबरच वाहतुकीचे नियम मोडणा-यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला. वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त मंदार धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक गिरीश बने, कोळसेवाडीचे सचिन सांडभोर आणि डोंबिवली शाखेचे अजय आफळे यांच्यावतीने ऑपरेशन राबविण्यात आले. थर्टी फर्स्टच्या कारवाईत ५५ मदयपी, विना लायसन्स वाहन चालविणारे, विना हेल्मेट दुचाकी चालविणारे, सिल्ट बेल्ट न लावता वाहन चालविणारे, भरधाव वेगात वाहन चालविणारे असे ९३७ वाहनचालक आदिंवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला. तर २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत केलेल्या कारवाईत ११० मदयपी वाहनचालकांची झिंग उतरविण्यात आली. तर वाहतुकीचे इतर नियम मोडणा-या ४ हजार ९४३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली गेली.
दरम्यान गेल्या २६ ते ३१ डिसेंबर या कालावधीत झालेल्या कारवाईचा एकंदरीतच आढावा घेता. एकुण १६५ मदयपी वाहनचालक आणि इतर नियम मोडणारे ५ हजार ८८० वाहनचालक अशा ६ हजार ४५ वाहनचालकांवर कारवाई करून संबंधितांकडून एकुण ५४ लाख ७९ हजार ६५० रूपयांचा दंड ठोठावल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त धर्माधिकारी यांनी दिली.