कल्याण-कल्याण पूर्वेतील मेट्रो हॉस्पिटल शेजारील मैदानात आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी या अभियानाचा शुभारंभ भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. डोंबिवली पूर्वेत टंडन रोडवरील धोत्रे मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबीराचा शुभारंभ महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांच्या हस्ते करण्यात आला.
शासनाच्या निर्देशानुसार "शासन आपल्या दारी" या अभियानांतर्गत महापालिकेकडून तसेच शासनाकडून राबविल्या जाणा-या विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी लाभार्थ्यांना/नागरीकांना उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेच्या दहाही प्रभागात भव्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
नागरीकांना अनेक बाबींची योजनांची माहिती मिळण्यासाठी शासनाकडे जावे लागते परंतू आता शासनाच्या अनेक योजना एकाच ठिकाणी नागरीकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्यामुळे या अभियानात सहभाग नोंदवून हे अभियान यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी उपस्थितांना केले. एकूण ४५ ठिकाणी या शिबीराचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त स्वाती देशपांडे-कुलकर्णी यांनी दिली आहे. या शिबीरांमध्ये पीएम स्वनिधी अंतर्गत लाभ, स्वच्छ भारत अभियान, अमृत योजना, आरोग्य तपासणी, महालॅब तपासणी, जन्म-मृत्यू दाखले, रेशनकार्ड सेवा, दिव्यांग योजना, पीएम ई-बस सेवा, पीएम उज्वल योजना, आयुष्यमान भारत कार्ड, विवाह नोंदणी, संजय गांधी निराधार योजना तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना प्राप्त होणार आहे.