लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून महायुतीमधील भाजपने आ. गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर करताच शिंदेसेनेच्या स्थानिक नेत्यांनी सुलभा यांचा प्रचार करणार नसल्याचे सोमवारी जाहीर केले. शिंदेसेनेतील इच्छुकांपैकी एक जण निवडणूक लढवणार असून, लवकरच घोषणा केली जाईल, असे शिंदेसेनेकडून सांगण्यात आले.
कल्याण पूर्वेतील शिंदेसेनेच्या निवडणूक कार्यालयात सोमवारी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीस विधानसभाप्रमुख नीलेश शिंदे यांच्यासह शहरप्रमुख महेश गायकवाड, माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी, नवीन गवळी, पप्पू पिंगळे, रमाकांत देवळेकर आदी उपस्थित हाेते.
महेश गायकवाड यांनी सांगितले की, कोणताही शिंदेसेनेचा पदाधिकारी भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांचे काम करणार नाही. हा मतदारसंघ शिंदेसेनेला मिळावा व शहराचा विकास व्हावा. विधानसभाप्रमुख नीलेश शिंदे म्हणाले की, कल्याण पूर्वेत शिंदेसेना वाढली आहे. आम्ही वारंवार पक्षप्रमुखांना विनंती करूनदेखील सुलभा यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे आम्ही बंडाच्या तयारीत आहोत. यापुढे जो काही निर्णय घ्यायचा तो आम्ही घेऊ.
गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यातील वाद वैयक्तिक आहे. महेश गायकवाड हे त्यांच्या भूमिका पक्षाची भूमिका म्हणून मांडत असतात. महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड याच आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यावर इच्छुक नाराज होणे स्वाभाविक आहे. मात्र, त्यांची समजूत महायुतीचे नेते घालतील. ही जागा महायुती नक्की निवडून आणेल. कुणी उमेदवारी अर्ज भरला तरी माघार घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर आहे. मधल्या काळात हा वाद संपुष्टात येईल.- नरेंद्र सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष, भाजप