कल्याण-कल्याण-पडघा मार्गावरील गांधारी पूलाच्या एका आधारस्तंभाला तडे गेल्याची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी हा पूल सोमवारी रात्री साडे दहा वाजल्यापासून वातूकीसाठी बंद केला आला आहे. पुलाच्या आधारस्तंभाला तडे गेल्याची पाहणी आज करण्यात येणार होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आले नाही. तसेच पाणीसाठी बोटच उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे पुलाची पाहणी उद्या बुधवारी केली जाणार आहे असे अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले.
कल्याण पडघा मार्गावर उल्हास नदीवरील गांधारी पूल आहे. या पूलाच्या एका आधारस्तंभाला तडे गेल्याची माहिती काही जागरुक नागरिकांनी दिली आहे. ही माहिती मिळताच वाहतूक नियंत्रण पोलिसांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून काल रात्री साडे दहा वाजल्यापासून हा पूल वाहतूकीसाठी बंद केला. पूलाच्या आधारस्तंभाला नेमका कुठे तडा गेला आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी येणार होते. त्यापैकी एक शाखा अभियंता अविनाश भानुशाली घटनास्थळी पोहचले होते.
मात्र नदीच्या पात्रत जाऊन ही पाहणी करावी लागणार असल्याने त्यांनी बोट मागविली होती. त्यांना तीन तासानंतरही बोट उपलब्ध झाली नसल्याने ही पाहणी रखडली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कल्याण कार्यालयातील उप अभियंता प्रशांत मानकर यांच्याकडे या विषयी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, त्यांचे वरिष्ठ अधिकारी कोकण दौऱ्यावर आहे. त्यामुळे पूलाची पाहणी उद्या बुधवारी केली जाईल. पाहणीनंतरच पूलाबाबत निर्णय घेतला जाईल. तोर्पयत हा पूल वाहतूकीसाठी बंद ठेवला जाणार आहे."
हा पूल वाहतूकीसाठी बंद ठेण्यात आल्याने बापगावचा कल्याणशी संपर्क तुटला. कल्याण पडगा रोडवरील वाहतूक कल्याण भिवंडी बायपासमार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे कल्याण भिवंडी मार्गावर वाहतूकीचा ताण वाढला आहे. बापगावातील नागरीकांना भिवंडी बायपासला वळसा घालून कल्याण गाठावे लागत आहे. गांधारी पूल हा १९९८ साली उभारण्यात आला. तो वाहतूकीसाठी १९९९ साली खुला करण्यात आला. गेल्या आठवडयात जोरदार अतिवृष्टी झाली. तेव्हा हा पूल नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पूलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. पुराच्या पाण्याचा फटका पूलाच्या आधारस्तंभाला बसला असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.