कल्याणमध्ये तृतीय पंथीयांच्या ख्याहिश फाऊंडेशनच्या वतीने 'गरीब थाळी' सुरु करण्यात आली आहे. या गरीब थाळी केंद्राचा शुभारंभ आज ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला. दहा रुपयात थाळी आणि एक रुपयांमध्ये नाश्ता दिला जाणार आहे.
या गरीब थाळी शुभारंभ प्रसंगी फाऊंडेशनच्या संस्थापकीय अध्यक्षा तमन्ना मन्सूरी, सल्लागार पूनम सिंग, रिपाईचे अण्णा रोकडे, भीमराव डोळस आदी मान्यवर उपस्थित होते. तृतीय पंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा गरीब थाळीचा पथ दर्शी प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. या गरीब थाळी केंद्राच्या माध्यमातून आदीवासी, गरीब गरजू विधवा माहिला आणि तृयीत पंथीय यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून सात तृतीय पंथीय 12 वीची आणि तीन जण बी कॉमची परिक्षा देणार आहेत. किन्नर, गरजू, विधवा आणि आदीवासी निराधारांना आसरा नाही. त्यांच्याकरीता मुरबाड येथे दहा एकर जागा आहे. त्याठिकाणी निवारा उभा करण्याकरीता बांधकाम साहित्याची गरज आहे. ते देण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी अध्यक्षा तमन्न मन्सुरी यांनी यावेळी केली.
जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी सांगितले की, तृतीय पंथीयांचा हा पथदर्शी प्रकल्प आहे. त्यांना रेशन कार्ड, आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र देण्याचे काम सुरु आहे. राज्यभरातून ठाणो जिल्ह्यात 782 तृतीय पंथीय मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. ठाणो जिल्हा हा तृतीय पंथीय मतदारांची नोंदणी करण्यात अव्वल ठरला आहे. आधारकार्ड आणि रेशनिंग कार्ड नोंदणीकराता फाऊंडेशनने सहकार्य केल्यास त्याला सरकारी यंत्रणोला जास्त उपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर 65 वर्षीय तृतीय पंथीयांना संजय गांधी निराधार योजने अंतर्गत मानधन देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे नार्वेकर यांनी यावेळी सांगितले. मुरबाड येथील फाऊंडेशनच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी दानशूर व्यक्तींकडून मदत मिळवून देणार असल्याचे नार्वेकर यांनी आश्वासीत केले.