कल्याण : पूर्वेतील चिंचपाडा परिसरातील श्रीराम अनुग्रह इमारतीत गुरुवारी सकाळी बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच तेथील रहिवाशांची बोबडीच वळली. आधी चाळीत नंतर इमारतीच्या एका विंगमधून दुसऱ्या विंगमध्ये, तर कधी दुसऱ्या मजल्यावरून तिसऱ्या मजल्यावर चकवा देणाऱ्या बिबट्याला १० तासांच्या अथक प्रयत्नांती अखेर सायंकाळी जेरंबद करण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले. त्यानंतर रहिवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. दरम्यान, यात पाच जण जखमी झाले.
श्रीराम अनुग्रह इमारतीत सकाळी ८:३० वाजता बिबट्या शिरल्याची माहिती एका महिलेने दिली. तेव्हा तिच्यावर कोणी विश्वास ठेवण्यास तयार नव्हते. खात्री केल्यावर इमारतीत खरोखरच बिबट्या शिरल्याचे समजताच रहिवाशांनी तातडीने दारे बंद केली. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. वन विभागाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पथकालाही वर्दी देण्यात आली. वन विभागाच्या अधिकारी गिरिजा देसाई यांच्या पथकाच्या मदतीने बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी पॉज, वर्ड वाइल्ड असोसिएट आदी प्राणी संघटनेचे स्वयंसेवक, पोलिस, वाहतूक पोलिस आदींच्या मदतीने बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.