कल्याण - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीत याठिकाणच्या महिला जिल्हा संघटकांसह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
ठाकरे गटाच्या कल्याण जिल्हा महिला संघटक विजया पोटे, माजी नगरसेवक अरविंद पोटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदें, श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी विजया पोटे म्हणाल्या की, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्राने चालणाऱ्या शिवसेना पक्षात आपण प्रवेश करत असून पूर्वी जिथे होते, तिथे आता १०० टक्के राजकारण होत असल्याचा आरोप पोटे यांनी केला.
तर बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठीच आम्ही दीड वर्षांपूर्वी वेगळा निर्णय घेतला होता. यापुढे शिवसेनेत कार्यरत होऊन पक्षवाढीसाठी सक्रिय व्हावे अशा शुभेच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना केल्या. कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत. यंदाच्या निवडणुकीतही त्यांना तिकीट मिळेल अशी शक्यता आहे. त्यातच या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्याकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली. दरेकरांच्या उमेदवारीवरून स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात होते. त्यानंतर आता ही नाराजी याठिकाणच्या महिला जिल्हा संघटक आणि कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावरून उघड दिसू लागली आहे.
दरम्यान, कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून श्रीकांत शिंदे यांनी प्रचार सुरू केला असला व खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली असली, तरी शिंदेच्या शिवसेनेने त्यांची उमेदवारी अधिकृत जाहीर केलेली नाही. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांची उमेदवारी घोषित झाली. परंतु भाजपाची साथ शिंदे यांना कशी मिळते, याकडे लक्ष आहे तर उद्धवसेनेतील एका गटाची नाराजी दरेकर यांच्या मार्गात अडथळा ठरत आहे.