मयुरी चव्हाण काकडे
कल्याण - लोकसभा निवडणूका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसं राजकारण अधिकच रंगतदार होऊ लागलं आहे. यात कल्याण लोकसभा मतदारसंघही विशेष चर्चेत आला आहे. भाजपा आमदाराच्या पत्नी सुलभा गायकवाड या ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये दिसल्या. आता मात्र कल्याण डोंबिवली मधील ठाकरे गटाच्या अनेक महिला आणि कार्यकर्त्या पदाधिका-यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुनबाई तथा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांची भेट घेतल्याची कुजबुज सुरू झाली आहे. या वृत्ताला ठाकरे गटाकडून नकार देण्यात आला असला तरी शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरे गटातील अनेक जण संपर्कात असल्याचं सांगण्यात आलं आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटातील काही सक्रिय महिला पदाधिकारी या वृषाली यांची भेट घेत असल्याचा एक रिल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाच्या एका पदाधिका-याने ही रील व्हायरल केली आहे. यामध्ये या महिला कार्यकर्त्या वृषाली यांच्यासोबत दिसून येत आहेत. यासंदर्भात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी कविता गावंड यांच्याकडे विचारणा केली असता हा रील मागच्या निवडणुकीची असून आम्ही अशी कोणतीही भेट घेतली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र ठाकरे गटातील दोन माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी / कार्यकर्ते आमच्या संपर्कात असून भेटी घेत असल्याचं सांगण्यात आलं. इतकंच नाही तर लवकरच कल्याण डोंबिवलीत राजकीय धमाका होणार असून अनेकांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांच्या नावाची घोषणा होताच अनेक पदाधिकारी यांनी माजी आमदार सुभाष भोईर यांचे निवासस्थान गाठत राजीनामे देण्याचा इशारा दिला होता. यासंदर्भातील वृत्तही सर्वात आधी "लोकमत"ने दिले होते. आता ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आणि वृषाली शिंदे यांचे एकत्रित फोटो व्हायरल होत असल्याने अनेक शंका निर्माण झाल्या आहेत.