डोंबिवली: नकारात्मक परिस्थितीचा यशस्वीपणे सामना करत सर्वच घटकांनी केलेल्या कठोर परिश्रमातून कल्याण परिमंडलाला राज्यात अव्वल स्थान गाठता आले. कल्याण परिमंडलाने मोलाची कामगिरी बजावली. लघुदाब घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि इतर ग्राहकांकडून कल्याण मंडल एक डोंबिवली, कल्याण पूर्व आणि पश्चिम विभाग वार्षिक वीजबिल वसुली १३९६ कोटी रुपये. त्यातही डोंबिवली विभागाची वार्षिक वीजबिल वसुली ३५३ रुपये कोटी एवढी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या आर्थिक वर्षातील कामगिरीचा आढावा व चालू आर्थिक वर्षातील आव्हाने यासंदर्भात कल्याण परिमंडलाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ही माहिती जाहीर।करण्यात आली. त्यावेळी मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, अधीक्षक अभियंते दीपक पाटील, दिलीप भोळे आणि राजेशसिंग चव्हाण यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे म्हणाले की, वसूली कार्यक्षमता १०३ टक्क्यांच्या घरात पोहचवणे हे वर्षभर व सातत्याने घेतलेल्या कठोर मेहनतीचा परिपाक आहे. त्यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा मार्च अखेर परिमंडलाच्या थकबाकीत उल्लेखनीय घट झाल्याचे त्यांनी नमूद केले. औंढेकर यांनी गत आर्थिक वर्षातील कामगिरीचा आढावा घेत योगदान देणाऱ्या सर्वांचे कौतूक केले.
विशेषत: वीजचोरांविरुद्ध व्यापक व पथदर्शी कारवायांचा त्यांनी गौरव केला. वीज गळती १२ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देतानाच तत्पर ग्राहक सेवेत कोठेही कमी पडणार नाही, याची दक्षता बाळगण्याची सूचना त्यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना केली. यावेळी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, कार्यकारी अभियंता (प्रशासन) अनिल महाजन, वरिष्ठ व्यवस्थापक विश्वनाथ कट्टा, निलेश भवर व शशिकांत पोफळीकर, क्षेत्रीय कार्यालयातील सर्व कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, सहायक व कनिष्ठ अभियंते, जनमित्र, कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता स्मीता काळे यांनी केले. तर अधीक्षक अभियंता भोळे यांनी आभार मानले.
उत्कृष्ट कामगिरीचा गौरव कल्याण परिमंडलात कल्याण एक आणि दोन, वसई, पालघर असे चार मंडल कार्यालये व त्यांतर्गत ९ विभागीय, ४२ उपविभागीय व १८० शाखा कार्यालये आहेत. गतवर्षीच्या कामगिरीत वसूली कार्यक्षमता व उद्दिष्टपूर्तीच्या निकषांवर कल्याण एक मंडल कार्यालय, डोंबिवली, कल्याण पश्चिम व उल्हासनगर दोन ही तीन विभागीय कार्यालये, प्रत्येक मंडलातील पहिले पाच उपविभागीय कार्यालये व १० शाखा कार्यालयांचा विशेष गौरव करण्यात आला.