- मुरलीधर भवार
कल्याण - पश्चिमेकडील अहिल्याबाई चौकातील शिंदे सदन या चार मजली अतिधोकादायक इमारत आहे. या इमारतीचा काही भाग इमारतीला लागून असलेल्या मंदिराच्या शेडवर कोसळल्याची घटना आज घडली. या दुर्घटनेत शेड खाली असलेला तरुण थोडक्यात बचावला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
शिंदे सदन ही इमारत अतिधोकादायक झाली आहे. या इमारतिची पडझड होत आहे. या इमारतीमुळे दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. या इमारतीमध्ये तीन कुटुंबे राहत नाही. इमारतीच्या आजूबाजूला रहिवासी इमारती आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मंडप आहे. आज सकाळच्या सुमारास या इमारतीचा काही भाग या मंदीराच्या शेडवर पडल्याने शेडचे सिमेंटचे पत्रे तुटून पडले. यावेळी पत्र्याखाली असलेल्या तरुणाने पळ काढला. त्यामुळे तो थोडक्यात बचावला. या घटनेनंतर धोकादायक अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न चर्चेत आला आहे. याबाबत महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे यांनी सांगितले की, ही इमारत अतिधोकादायक आहे. इमारतीमध्ये तीन कुटुंब राहत असून त्यांना इमारत रिकामी करण्याबाबतसूचना केली आहे. इमारतीचे परीक्षण करून तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.