मुरलीधर भवार, कल्याण: कल्याण रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड, न्यायालय, तहसीलदार, सरकारी रुग्णालये या विविध वर्दळीच्या ठिकाणाहून नागरिकांचे गहाळ झालेले ४४ मोबाइल महात्मा फुले पाेलिस ठाण्याच्या पाेलिसांनी शिताफीने शाेधून काढले. नागरिकांना आज हे माेबाइल फाेन सन्मानपूर्वक परत करण्यात आले. यावेळी माेबाइल परत हातात मिळाल्याच्या आनंदाने नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.
सहाय्यक पाेलिस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या कार्यालयात त्यांच्या हस्ते नागरिकांना माेबाईल परत करण्यात आले. या वेळी महात्मा फुले पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरिक्षक अशाेक हाेनमाने यांच्यासह पाेलिस निरिक्षक दीपक सराेदे, प्रदीप पाटील यांच्या तपास कामातील त्यांचा सर्व स्टाफ उपस्थित हाेता. अनेकांनी माेबाइल परत मिळाल्याने पाेलिसांचे आभार व्यक्त करीत त्यांच्या या कामागिरीचे काैतुक केले. हरवलेली वस्तू अनेकदा पुन्हा मिळत नाही, मात्र पाेलिसांनी हरविलेली वस्तू पुन्हा मिळवून देण्याची किमया साधल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.