कल्याण-मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ््या दोन सराईत चोरट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. राम प्रवेश सहानी आणि विशाल सुरवाडे अशी या चोरट्यांची नावे आहेत. हे दोघेही सराईत चोरटे आहेत. या दोघांकडून काही मोबाईल हस्तगत केले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.
४ मे २०२३ रात्री ९ वाजताच्या सुमारास विठ्ठलवाडी ते कल्याण रेल्वे स्टेशनच्या दरम्यान इंद्रायनी एक्सप्रेस गाडीतून दरवाजात उभे राहून प्रवास करीत असताना फिर्यादीच्या हातातील मोबाईल फोन खाली पडला. तो मोबाईल फोन एक व्यक्ती त्वरीत घेऊन गेला. गाडीची गती मंद होती. त्याने चोरट्याला पाहिले. गाडीत असल्याने ते काही करु शकले नाही. या प्रकरणी त्यांनी कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत होते. तर दुसरी घटना १८ ऑक्टाेबर २०२१ सालची आहे. भागलपूर लोकमान्य टिळक एक्सप्रेस गाडीतून प्रवास करीत असणारा प्रवासी झाेपला होता. झोपेचा फायदा घेत चोरट्या मोबाईल घेऊन धूम ठोकली होती. या दोन्ही प्रकरणातील आरोपीना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.
२०२१ सालच्या चोरी प्रकरणात विशाल सुरवाडे याला अटक केली आहे. २०२३ च्या घटनेत राम प्रवेश सहानीला अटक करण्यात आली आहे. हे दोघेही सराईत आहे. या दोघांनी अन्य काही चोर्या केल्या आहेत का त्याचा तपास सुरु आहे. वरिष्ठ पाेलिस निरिक्षक अर्चना दुसाणे, पोलिस अधिकारी प्रमोद देशमुख, ए. व्ही जावळे, जी. व्ही राणे यांनी ही कारवाई केली आहे.