नारायण जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल या चार महानगरांच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या कल्याण-तळोजा मेट्रो-१२ या मार्गांचे आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. या मार्गातील सर्व १७ मेट्रो स्थानकांसह डेपोंचे बांधकाम आणि विद्युतीकरणाच्या कामासाठी अखेर एमएमआरडीएला मुहूर्त सापडला आहे. मेट्रो-१२ हा मेट्रो-५चा विस्तार असून, हा संपूर्ण मार्ग २०.७५६ किलोमीटरचा आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ५८६५ कोटी इतका असून, या मार्गात १७ स्थानके असतील. स्थानक, फलाटांचे बांधकाम, विद्युतीकरणाच्या कामासाठी कंत्राटदारांचा शोध एमएमआरडीएने सुरू केला आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया २८ डिसेंबरपासून सुरू केली असून, २ फेब्रुवारी २०२३ पर्यंत निविदा सादर करायच्या आहेत. यामुळे नव्या वर्षातच ७ फेब्रुवारी २०२३ रोजी निविदा उघडून नंतर कंत्राटदार नेमून कामास सुरुवात होणार आहे.
'या' स्थानकांचा समावेश- या मार्गात १७ उन्नत स्थानके असतील. यात गणेशनगर, पिसवलीगाव, गोळवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव या नऊ स्थानकांसह दोन्ही बाजूला फलाटासह स्टेशन हॉल उन्नत राहणार आहे; तर निळजेगाव, बाले, वाकळण, तुर्भे, पिसावे डेपो, पिसावे येथील फलाट स्टेशन इमारत व फलाट उन्नत राहणार आहे. तर तळोजा स्थानकात एकाच बाजूला फलाट राहणार आहे. वडवलीत एकाच बाजूला ट्रॅक राहणार असून, सोबत आणखी एक अतिरिक्त ट्रॅक राहणार आहे.
पिसावेत डेपो- मेट्रो क्रमांक १२ चा प्रमुख डेपो पिसावे येथे असेल. यामुळे एमएमआरडीएला येथे मोठी जागा संपादित करावी लागणार आहे. डेपो म्हटले की, कारशेडही आली. यामुळे भविष्यात या भागात मेट्रोची वर्दळ वाढणार आहे.
शीळफाटा-तळोजा-पनेवलला फायदा- या प्रकल्पाचा कल्याण-डोंबिवली, शीळफाटासह नवी मुंबईतील रहिवाशांना फायदा होणार आहे. येत्या काळात निळजेजवळ एमएमआरडीएचे ग्रोथ सेंटर उभे राहत आहे, तर शीळफाटा परिसरात लोढा, रुणवालसह इतर बांधकाम व्यावसायिकांच्या खासगी टाऊनशिप आकार घेत आहेत. याच भागात बुलेट ट्रेनचे ठाणे जिल्ह्यातील एक स्थानक-डेपो दिवा-आगासन-म्हातार्डीत उभे राहत आहे.
तीन मेट्रो एकमेकांस जोडणार- सध्या काम सुरू असलेली ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोसह कांजुरमार्ग-बदलापूर आणि कल्याण-तळोजा मेट्रो एकमेकास जोडल्या जाणार आहेत. यात भिवंडी-कल्याण मेट्रो ही मेट्रो १२ ही कल्याण येथेच जोडली जाणार असून, निळजेच्या आसपास ती कांजुरमार्ग-बदलापूर मेट्रोला जोडली जाणार आहे.
२६८.५३ कोटीचा सल्लागार- मेट्रो मार्ग क्रमांक १० गायमुख ते शिवाजी चौक, मीरारोड आणि मेट्रो मार्ग क्रमांक १२ कल्याण ते तळोजासाठी मेसर्स सिस्ट्रा एस.ए आणि मेसर्स डी.बी. इंजिनिअरिंग आणि कन्सल्टिंग जीएमबीच यांची संयुक्त निविदे एमएमआरडीएने आपल्या २७१ व्या बैठकीत मान्यता दिली आहे. सल्लागारांवरील ही रक्कम २६८ कोटी ५३ लाख ३५ हजार ८६० रुपये आहे.