मुरलीधर भवार, कल्याण :कल्याण-तळोजा मेट्रो रेल्वच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. कल्याण शीळ रस्त्यालगत नवीन पलावा आणि रुनवाल गृहसंकुल प्रकल्पाच्या नजीक कल्याण तळोजा मेट्रो रेल्वेच्या पायाभरणीची सुरवात करण्यात आली आहे. ३ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कामाचे भूमीपूजन करण्यात आले होते.
मुंबईच्या जवळ आहे परतुं तरीही मुंबईपासून खूप दूर आहे’ अशी अवस्था कल्याण आणि डोंबिवली परिसराची होती. मुंबईत नोकरीनिमित्त जाणारे चाकरमानी, शिक्षणाच्या निमित्ताने जाणारे विद्यार्थी आणि इतर कामानिमित्त मुंबईत जाणारे नागरिक यांचा त्रास कमी होणार आहे, कल्याण तळोजा मेट्रो ही वर्षे रखडणार की काय अशी भीती मला वाटत होती. परंतू हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्यास सुरुवात झाली आहे. कल्याण डोंबिवली सह आसपासच्या शहरांच्या वाहतूक व्यवस्थेचा चेहरा मोहरा बदलून जाणार असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले होते. या मेट्रो मुळे तिसरी मुंबई आता नवी मुंबई आणि कल्याण यांच्यामध्ये विस्तारली जात असल्याचा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व्यक्त केला आहे.
कल्याण - तळोजा हा देशातील सर्वात लांबीचा असा मेट्रो मार्ग आहे. एमएमआरडीएच्या ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. कल्याण – तळोजा असा हा मार्ग असून या मार्गावर १९ मेट्रो स्थानकांचा समावेश आहे.
कल्याण, एपीएमसी कल्याण, गणेश नगर, पिसावली गाव, गोलावली, डोंबिवली एमआयडीसी, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव, निळजे गाव, वडवली, बाळे, वाकळण, तुर्भे, पिसार्वे डेपो, पिसार्वे आणि तळोजा ही स्थानके आहेत. शहरी भागासह ग्रामीण भागातूनही जाणारा हा पहिलाच मेट्रो मार्ग आहे. यासाठी ५ हजार ८६५ कोटी रुपयांचा खर्च या मार्गासाठी होणार आहे. या मार्गामुळे ठाणे भिवंडी येथील प्रवासी कल्याण पर्यंत येऊ शकेल आणि पुढे तळोजा मार्गे नवी मुंबई मेट्रो पर्यंत पोहोचू शकतील. भविष्यात मेट्रो १४ अर्थात बदलापूर मेट्रोची उभारणी झाल्यानंतर अंबरनाथ बदलापूर हा भाग या मेट्रोमुळे थेट नवी मुंबई ठाणे भिवंडी या शहरांशी जोडला जाईल. मेट्रो ५ ची संलग्नता मुंबई मेट्रोशी असल्यामुळे रेल्वे प्रवास सोडून मेट्रोने मुंबई, नवी मुंबई, ठाणे यांसारखी शहरे गाठता येणार आहेत असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले.