कल्याण - जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कल्याण तालुक्यात अनेकांचे नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्यांना कुटुंबाना सरकारकडून जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झालेल्या अनुदानापैकी १६ कोटी ३६ लाख रुपयांचे अनुदान कल्याण तालुक्यातील बाधितांसाठी देण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार विजय पाटील देण्यात आली आहे.
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कल्याण तालुक्यात राहणाऱ्या ज्या नागरीकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले होते. त्यांचे पंचनामे कल्याण तहसील कार्यालयाकडून करण्यात आले होते. तहसील कार्यालयाने १५ हजार ९२४ बाधित कुटुंबाचे पंचनामे करुन मदतीसाठी अनुदानाची मागणी करणारा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील नुकसान भरपाईचा एकत्रित पंचनाम्यांचा अहवाल सरकारकडे पाठविला होता.
सरकारने बाधितांना दिलेल्या रक्कमेपैकी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कल्याण तालुक्यातील बाधित कुटुंबियांना १६ कोटी ३६ लाख ५५ हजार रुपयांची रक्कम दिली आहे. ज्या घरात पावसाचे पाणी शिरले. त्या घरांचे पंचनामे केले गेले. त्याना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत वाटप करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या रक्कमेपैकी आत्तापर्यंत ३ हजार २४६ बाधितांना प्रत्येकी दहा हजार रुपये याप्रमाणे ३ कोटी ३४ लाख ६० हजार रुपयांची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत उर्वरीत १२ हजार ६३८ बाधितांना १२ कोटी ६७ लाख ८० हजार रुपये वितरीत करण्यात येणार असल्याचे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.
२०१९ सालातील १४ हजार ८६९ बाधित मदतीपासून वंचित
जुलै २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत १९ हजार ५६४ बाधितांना १८ कोटी २८ लाख १० हजार रुपयांची मदत सरकारकडून प्राप्त झाली होती. ही रक्कम कल्याण तहसील कार्यालयाकडून वितरीत करण्यात आली होती. मात्र १४ हजार ८६९ बाधितांना मदत मिळाली नव्हती. त्यांच्या मदतीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तत्कालीन तहसीलदार दीपक आकडे यांनी पाठविला होती. सरकारकडून १४ कोटी ७९ लाख ४० हजार रुपयांची मदत अद्याप मिळालेलीच नाही.