कल्याण: तापामुळे सहा महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या दीड वर्षाच्या मुलीच्या दफन केलेल्या मृतदेहाची हाडे न्यायालयाच्या आदेशानुसार गुरुवारी बाहेर काढण्यात आली. ही हाडे मुंबईतील कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आली आहेत. तपासणी अहवाल आल्यानंतर मुलीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे सूत्रांनी सांगितले.शहरातील गोविंदवाडी परिसरात राहणारे छोटू साहानी यांची दीड वर्षाची मुलगी नेहा ही तापाने आजारी पडली. तिला उपचारासाठी साहानी यांनी सूचकनाका येथील डॉक्टर आलम यांच्याकडे नेले असता त्यांनी औषधे दिली. मुलीचा ताप उतरत नसल्याने तिची तब्येत बिघडली. ७ जुलै २०२१ ला नेहाचा मृत्यू झाला. साहानी यांनी मुलीला केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातही नेले होते. तिच्या मृत्यूप्रकरणी साहानी यांनी टिळकनगर आणि कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन न करताच तिचा मृतदेह दफन करण्यात आला. मुलीच्या मृत्यूस डॉक्टर व त्याचा साथीदार जबाबदार असल्याचा आरोप साहानी यांनी केला. याप्रकरणी त्यांनी कल्याण न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल झाला. दरम्यान डॉक्टरसह त्याच्या साथीदाराला न्यायालयाने अंतिम जमीन मंजूर केला.
गुरुवारी नायब तहसीलदार सुषमा बांगर यांच्या उपस्थितीत पोलीस आणि तज्ज्ञ डॉक्टरांनी मुलीला जेथे दफन केले होते, तेथे जाऊन मुलीच्या हाडांचे नमुने घेतले. ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पाठविला आहेत. अहवालातून मृत्यूचे सत्य बाहेर येऊ शकते, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.