डोंबिवली : ज्या लोकसभा मतदार संघांचे मतदान 20 मे रोजी आहे, अशा मतदार संघांत 24-कल्याण लोकसभा मतदार संघाचा अंतर्भाव होतो. या 24 कल्याण लोकसभा मतदार संघात निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या तथापि मतदार संघाबाहेर इतर ठिकाणी मतदार असलेल्या अधिकारी/ कर्मचारी वर्गासाठी टपाली मतदानाची सुविधा (पोस्टल बॅलेट) काल उपलब्ध करुन देण्यात आली होती. मतदारसंघ परिक्षेत्राबाहेर मतदार असलेल्या 564 अधिकारी/ कर्मचारी वर्गाने टपाली मतदानाद्वारे आपल्या मतदानाचा हक्क काल बजावला. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिरात सुरु असलेल्या 144-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या टपाली मतदान प्रक्रियेची समक्ष पाहणी केली तद्नंतर त्यांनी नेतीवली नाका येथील SST पथकाची देखील पाहणी करून संबंधित पथकास योग्य ते निर्देश दिले. केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) मनोज जैन यांनी समक्ष या प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी 24-कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते उपस्थित होत्या. सदरची प्रक्रिया ही उमेदवारांच्या प्रतिनिधींसमक्ष करण्यात येत आहे.
कल्याण : मतदारसंघाबाहेरील मतदारांनी बजावला टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क!
By अनिकेत घमंडी | Published: May 13, 2024 6:46 PM