कल्याण : प्रकाश शिंदे मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक व ट्रॅव्हल कंपनीचे संचालक रणधीर शिंदे व पत्रकार सिद्धार्थ गायकवाड यांचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते दिल्ली येथील एनडीएमसी सेंटरमध्ये ‘राष्ट्रीय समाजसेवा पुरस्कार २०२४’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. नशामुक्त दिनाचे औचित्य साधत इंटिग्रेटेड अचिवर्स, दिल्ली व आयुष इन्स्टिट्यूट, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त भारत अभियान सेमिनार व पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रकाश शिंदे मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून विविध समाजसेवी उपक्रम व ट्रॅव्हल कंपनीमार्फत सेवा ज्येष्ठ नागरिकांना पर्यटनाच्या माध्यमातून उत्तम सेवा दिल्याबद्दल शिंदे यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. पत्रकार गायकवाड यांना समाजातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून उत्कृष्ट पत्रकारितेबरोबरच नशामुक्ती अभियान व विविध सामाजिक कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास आयुष व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार राजाभाऊ वाझे, आयुष इन्स्टिट्यूटचे संचालक संदीप तांबारे, इंटिग्रेटेड अचिवर्सच्या संचालिका जुही सबरवाल, डॉ. राहुल सूर्यवंशी व डॉ. प्रशांत खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.