प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार सर्वत्र देशात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. केडीएमसीच्या वतीने देखील कल्याण डोंबिवली शहरात ही मोहीम पार पडली. दरम्यान ज्या ज्या ठिकाणी ही मोहीम राबविली गेली त्यात एमआयडीसी विभागाचा समावेश नव्हता. याबाबत कल्याण अंबरनाथ मॅन्यूफ्रॅक्चर्स असोसिएशन (कामा) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही कर भरत नाहीत का? असा सवाल करीत ‘कामा’ने पुढाकार घेत औद्योगिक परिसराची साफसफाई केली.
महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी रविवारी स्वच्छता मोहीम राबविली गेली. यासाठी ठिकठिकाणी विशिष्ठ अधिका-यांची नेमणुक केली गेली होती. परंतू या स्वच्छता मोहीमेत एमआयडीसी फेज १ आणि फेज २ हे दोन्ही विभागांचा समावेश नव्हता याकडे ‘कामा’ ने लक्ष वेधले आहे. हा औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये काम करणा-यांवर अन्याय नाही का? आम्ही कर भरत नाहीत का? हा दुजाभाव असून केडीएमसीने दुर्लक्ष केल्याने आम्हीच आमचा परिसर स्वच्छ करीत स्वच्छता मोहीम राबविली अशी माहीती ‘कामा’ संघटनेच्या वतीने दिली गेली.