केडीएमसी हद्दीत कोरोना रूग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसतेय. तरीही भविष्यात गंभीर स्वरूपाच्या रूग्णांना बेडसाठी धावाधाव करावी लागू नये याकरिता डोंबिवली एमआयडीसीमधील विभा कंपनीच्या जागेत केडीएमसी प्रशासनाकडून कोरोना रूग्णालय उभारल जात आहे. विशेष म्हणजे या कंपनीच्या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर कोरोना बाधित झालेल्या लहान मुलांवर उपचार केले जाणार आहेत. केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आयएमएच्या डॉक्टरांसोबत विभा कंपनीच्या इमारतीत कोरोना रुग्णालयाच्या सुरू असलेल्या कामाची नुकतीच पाहणी केली. येत्या दिवसात दुर्दैवाने लहान मुलांचं बाधित होण्याच प्रमाण वाढलं तर पालकांना धावपळ करावी लागू नये म्हणून ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण 580 बेडस चे हे रुग्णालय असणार आहे. यापैकी 100 बेड हे लहान मुलांसाठी असणार आहेत. यामध्ये एनआयसीयु बेडचाही समावेश आहे. मातांना आपल्या बाळाला स्तनपान करता यावे यासाठी वेगळी व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. आयएमएच्या पीडयाट्रिक टास्क फोर्सन यासंदर्भात एक मेडिकल लॉजिस्टिक रिपोर्ट केडीएमसी प्रशासनाला दिलाय. या रिपोर्ट मध्ये लहान मुलांना लागणारी सुई, व्हेंटिलेटर, खाटा, आवश्यक असणारी औषध इत्यादी माहितीचा समावेश असल्याच कल्याण आयएमएचे अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील यांनी सांगितलं.सावित्रीबाई फुले नाट्यगृहापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विभा कंपनीची जागा केडीएमसी प्रशासनाने ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला होता. या कंपनी अंतर्गतचे न्याय प्रविष्ठ प्रकरण मार्गी लागल असून अंतिम निकाली निघेपर्यंत ही जागा कल्याणडोंबिवली महानगरपालिकेला कोरोनां रूग्णांच्या वापरासाठी काही काळ द्यावी असे आदेश उच्च न्यायालयाने कंपनी प्रशासनाला दिलेत. ही जागा मिळवण्यासाठी केडीएमसी आयुक्त सूर्यवंशी हे प्रयत्नशील होते.
लहानग्यांसाठी KDMC चं महत्वाचं पाऊल! डोंबिवलीत कोरोनाबाधित लहान मुलांसाठी 100 बेड राखीव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 5:03 PM