कल्याण : राज्य सरकारतर्फे २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छता स्पर्धेत कल्याण डोंबिवली महापलिकेने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. महापालिकेला १० कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त झाला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांना पुरस्कार देण्यात आला आहे.
महापालिका आयुक्त दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कायापालट अभियान राबविले गेले. शहरातील रस्ते, वाहतूक बेटे यांचे सौंदर्यीकरण केले. शहरातील विविध शाळा, सरकारी कार्यालये,निवास स्थाने, खाजगी मिळकतींच्या वाडे भिंतींवर जे.जे.कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमार्फत सुंदर चित्रे रंगविण्यात आली. शहरातील महापालिका शाळांतील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी नववर्ष दिनी गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा ही संकल्पना राबविली.
आंबिवली येथील उजाड टेकडीवर १५ हजार पेक्षा जास्त वृक्षांची लागवड करुन टेकडीचे ऑक्सीजन झोनमध्ये रुपांतर केले. कल्याणमधील सर्वात जुना शेनाळे तलावप्रबोधनकार ठाकरे सरोवराचा संपूर्ण कायापालट करुन सुशोभिकरण करण्यात आला. इतकेच नव्हे तर खाडीकिनारी ठिकठिकाणी असलेल्या दगडांवर मनोहारी चित्रे रेखाटण्यात आली. स्मार्ट सिटी मार्फत उल्हास नदी किनाऱ्यालगत नौदल गॅलरीसह अडीच कि.मी. लांबीचा रिव्हर फ्रंन्ट विकसित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कल्याण खाडी किनारी गणेश घाट येथे भारतीय नौदलामार्फत प्राप्त झालेली युध्द नौका नागरीकांच्या माहितीसाठी ठेवण्यात आली आहे. रस्ते दुभाजकांवरील रंगरंगोटी हरित पट्टे विकसीत करण्यात आल्याने महापालिकेस दुस-या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.
या पुरस्कारासाठी सर्व लोक प्रतिनिधी, महापालिका शहर अभियंता अर्जुन अहिरे, महापालिका सचिव संजय जाधव, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत तसेच,उमेश यमगर इतर अधिकारी/कर्मचारी वर्ग त्याचप्रमाणे क्रेडाई एमसीएचआय ,पर्यावरण दक्षता मंडळ, सोलस इंडिया ऑनलाईन, सहयोग सामाजिक संस्था, निर्मल युथ फाऊंडेशन, श्रीमती चंदामाता सेवा संस्था, ऊर्जा फाऊडेशन तसेच इतर स्वयंसेवी संस्था, इंडियन मेडिकल असोसिएशन, महापालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालये, विविध शिक्षण संस्थांमधील एनएसएस ग्रुप व नागरिक यांचा सहभाग मोलाचा आहे.
यापूर्वी ही मिळाले पुरस्कारकोव्हीड इन्होवेशन पुरस्कार, ऊर्जा संवर्धन पुरस्कार, गतर्षींचा फ्रिडम टू वॉक या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार, वाचन प्रेरणा दिनानिमित्त प्राप्त झालेल्या द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आणि कालच जाहिर झालेला फ्रीडम टू वाॅक, सायकल आणि रन या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला.