कल्याण - मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील हॉटेल/बार, टप-यांवर कारवाई आज दुसऱ्या दिवशीही करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड़ यांच्या आदेशानुसार उपायुक्त रमेश मिसाळ आणि अवधूत तावडे यांनी ही धडक कारवाई केली आहे. सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी काटई कोळेगाव येथील तळ अधिक तीन मजली असलेल्या साईकृपा आणि रुक्मिणी हॉटेलवर पोलिस बंदोबस्तात पाडकामाची कारवाई जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आली. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
कल्याण पूर्वेतील कशिश बार ॲन्ड रेस्टॉरंट आणि रंगिला बार ॲन्ड रेस्टॉरंटच्या विरोधातही कारवाई करण्यात आली. डोंबिवली पश्चिमेतील सर्व शाळा परिसरातील १०० मीटरच्या अंतरात असलेल्या पान तंबाखू टपऱ््या आणि मद्य विक्रीची दुकानांवर कारवाई करुन चार दुकानातून माल जप्त करण्यात आला. ही दुकाने सील करण्यात आली आहेत. एका दुकानात आक्षेपार्ह सामान आढळून आल्याने त्याच्या विरोधात विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण पश्चिमेतील स्मार्टसिटी रोड आणि खडकपाडा परिसरातील फूड स्टॉलवर कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर कोळीवली गावातील जे. बी. लाऊंजच्या विरोधात कारवाई केली. ही कारवाई दिवसभर सुरु होती. कल्याण पूर्वेतील फेरीवाला हटाव पथकाने शाळांच्या परिसरातील गुटखा, तंबाखू विक्री करणा-या टप-या पाडण्यातआल्या.
केडीएमसीच्या कारवाईमुळे बारचालकांमध्ये खळबळ -कोळीवली येथील रुक्मिणी बारवर महापालिकेनेकारवाई केली, या कारवाई नंतर बार मालक चालकांनी कारवाईस विरोध केला आहे. बारच चालक जयंत शेट्टी यांनी सांगितले की, आम्ही सरकारचे विविध कर भरतो, हॉटेल इंडस्ट्रीवर शेकडो लोकांचा उदरनिर्वाह आहे, कारवाई केल्यानंतर आम्हीच नाही तर हॉटेलवर उदरनिर्वाह असणारे शेकडो लोक रस्त्यावर येतील, , मार्च महिन्यातच बार परवान्याचे नुतनीकरण केले आहे. बेकायदा बांधकामांना सोडून बारला लक्ष्य केले जात आहे. सरकारने आम्हाला पर्याय उपलब्ध करुन द्यावा अन्यथा या कारवाईच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.