कल्याण-माजी राष्ट्रपती स्वर्गीय डाॅ. ए. पी. जे. कलाम यांच्या स्मृती जतन करण्यासाठी १५ आॅक्टाेबर राेजी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येताे. मराठी आणि अन्य भाषिकांमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने राज्य सरकारने राज्यातील महापालिकांकरीता एका स्पर्धेचे आयाेजन केले हाेते. त्यात कल्याण डाेंबिवली महापालिकेस दुसरा क्रमांकाचा पुरस्कार जाहिर झाला आहे.
महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, माहिती आणि जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव यांनी एक समिती तयार करुन जास्तीत-जास्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन केले हाेते. महापालिकेतील वर्ग एक आणि वर्ग दाेनच्या अधिका-यांसाठी गद्य वाचन स्पर्धा व्याकरण व चिन्हांसहित त्याचप्रमाणे महापालिका अधिनियम चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
अधिकारी आणि कर्मचारी वर्गासाठी स्वरचित घोषवाक्य स्पर्धा, स्वरचित काव्यवाचन आणि सादरीकरण स्पर्धा, चारोळी स्वरचित स्पर्धा, बोली भाषा स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा , माय मराठीचा प्रचार, शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी निबंध स्पर्धा, वाकप्रचार, सुविचार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभागी झाले. स्पर्धेतील विजेत्यांना पुस्तक रुपी पारितोषिक प्रदान करताना कल्याणमधील वाचन प्रेमी कदम कुटूंबियांचा "कुटूंब रंगलय वाचनात" हा बहारदार कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. त्याचे सादरीकरण सरकार दरबारी सादर केल्यानंतर राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने राज्य स्तरीय दुस-या क्रमांकाचे पारीतोषिक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेस जाहीर केले आहे.
यापूर्वी महापालिकेस काेविड काळात चांगली कामगिरी बजावल्यानिमित्त केंद्र सरकारकडून "कोव्हीड इनोव्हेशन पुरस्कार" आणि राज्य सरकारकडून “उर्जा संवर्धन पुरस्कार" प्राप्त झाला हाेता. त्यापाठोपाठ महाराष्ट्र शासनच्या मराठी भाषा विभागाचा व्दितीय पुरस्कार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेस प्राप्त झाल्यामुळे महापालिकेच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.