- मुरलीधऱ भवार
कल्याण - दिवाळीपूर्वी शहर कचरा आणि खड्डे मुक्त करण्याचा मानस कल्याणडोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी व्यक्त केला आहे.
आज स्थायी समितीच्या दालनात आयुक्त दांगडे यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिका:यांसह बैठक घेतली. या बैठकीपश्चात घनकचरा व्यवस्थापनाविषयी महापालिका प्रशासनाने काय नियोजन केले आहे याची माहिती आयुक्त दांगडे यांनी दिली. या बैठकीस उपायुक्त अतूल पाटील आदी उपस्थित होते. आयुक्त दांगडे यांनी सांगितेल की, शहरातील अनेक ठिकाणी रस्ते अरुंद आहे. त्याठिकाणी घंटा गाडय़ा पोहचू शकत नाही. त्याठिकाणी हॅण्ड कार्डचा उपयोग केला जाईल. त्याद्वारे कचरा उचलण्याचे काम केले जाईल. तसेच ज्याठिकाणी हॅण्ड कार्डही पोहचू शकत नाही. त्याठिकाणी सफाई कामगार डबा घेऊन कचरा गोळा करुन तो कचरा गाडी टाकला जाईल. त्यानंतर तो कचरा प्रक्रिया केंद्रार्पयत आणला जाईल. अनेक ठिकाणी शहरात कच-याचे ढिग असतात. त्याठिकाणचा कचरा हा रात्रीच्या वेळेत उचलला जाईल. रात्री दहा ते दीड वाजताच्या वेळेत रात्रपाळीत हा कचरा उचलला जाईल. त्यानंतर सकाळी साचलेला कचरा हा सकाळी दुपारच्या सत्रत उचलला जाईल. कचरा उचलण्यासाठी असलेल्या गाडय़ांपैकी ५ टक्के वाहने ही नादुरुस्त आहे. त्यामुळे अतिरिक्त वाहने घेतली जाईल. त्याबरोबर कचरा उचलण्यासाठी मनुष्यबळ कमी आहे. मनुष्यबळही अतिरिक्त घेतले जाणार आहे. येत्या पंधरा दिवसात कचरा उलचण्याचे नियोजन केले असून दिवाळी पूर्वी शहर कचरा मुक्त करण्याचे लक्ष्य प्रशासनाने डोळ्य़ासमोर ठेवले आहे. कचरा प्रकल्पात प्रक्रियेसाठी गोळा झालेल्या कच:यावर प्रक्रिया करण्यात दिरंगाई करणा:या कचरा ठेकेदाराला दंड ठोठावण्यात आला आहे. शहर स्वच्छतेच्या कामासाठी अन्य विभागाच्या उपायुक्तांना प्रत्येक प्रभाग दिला असून या कामात सहाय्यक आयुक्तांनाही जोडून घेण्यात आले असल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.
डोंबिवली औद्योगिक विभाग आणि औद्योगिक निवासी भागातील कचरा उचलण्यासाठी एमआयडीसीसोबत समन्वय साधून अधिका:यांची एक बैठक लवकर घेतली जाईल. या भागातीलही कचरा महापालिकेच्या वतीने उचलला जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
कोरोना काळापूर्वी सफाई कामगारांची बायोमेट्रीक हजेरी सुरु होती. कोरोना काळात ही यंत्रणा बंद करण्यात आली. या बायोमेट्रीक यंत्रच्या दुरुस्तीसाठी जास्त खर्च येणार आहे. त्यामुळे दुरुस्ती ऐवजी नव्याने ही यंत्रणा कार्यान्वीत करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. शहर स्वच्छतेच्या सोबत शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठीही नियोजन करण्यात आले आहे. दिवाळी पूर्वी रस्त्यावरील खडडे बुजविण्यात येतील हे देखील आयुक्तांनी सांगितले.