कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कचरा उचलण्यासाठी नेमलेल्या ठेकेदारांच्या कामगारांकडून महिन्यातून दोन ते तीन वेळा पगारासाठी आंदोलन छेडले जात असून यामुळे शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडत आहे. दरम्यान ठेकेदाराकडून पगार थकवत असल्याने आज खडकपाडा कार्यशाळेतील 250 सफाई कामगारांनी पालिकेच्याविरोधात घोषणाबाजी करत मनसे कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली कामबंद आंदोलन केले.
यावेळी पालिकेकडून वारंवार पगारासाठी तारखा दिल्या जात होत्या. मात्र, पगार दिला जात नसल्याने कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत पगार मिळत नाही, तोपर्यंत सुट्टी जाहीर केली असून पगार मिळाल्यानंतरच कामावरती येण्याची भूमिका मांडली आहे. मात्र, कामगारांच्या या भूमिकेमुळे नागरिक त्रस्त झाले असून एकाच आठवड्यात दोन विविध संघटनेचा काम बंद आंदोलन केल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून पालिका प्रशासनाने काहीतरी ठोस उपाय काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे.