लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या उर्दू शाळेला स्वच्छतागृह नसल्याने एका माजी नगरसेवकाच्या पुढाकाराने स्वच्छतागृह बांधण्यास सुरुवात केली. मात्र, या स्वच्छतागृहाची तक्रार एका आरटीआय कार्यकर्त्याने केली. त्या बदल्यात पैशांची मागणीही केली. पालिकेच्या सहायक आयुक्तांनी आरटीआय कार्यकर्त्याला घाबरून बांधण्यात येणारे स्वच्छतागृह तोडून टाकल्याची घटना समोर आली आहे.
कल्याण पूर्वेतील पत्रीपुलाजवळ पालिकेची गफूर डोन ही उर्दू माध्यमाची शाळा आहे. या शाळेतील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. ही समस्या लक्षात घेता माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी त्यांच्या सहकाऱ्यास सांगून विद्यार्थ्यांची गैरसाेय दूर करण्याकरिता स्वच्छतागृह बांधण्यास सांगितले. सादिक शेख यांनी स्वच्छतागृहाचे काम सुरू केले. स्वच्छतागृहाचे बांधकाम सुरू असताना एका आरटीआय कार्यकर्त्याने तक्रार केली. तक्रार मागे घेण्यासाठी काही रक्कम ठरली. तक्रारदाराला पैसे मिळाले नसल्याने त्याने स्वच्छतागृहावर कारवाईसाठी तगादा सुरू ठेवला. महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांच्या आदेशानुसार सहायक आयुक्त सविता हिले यांनी स्वच्छतागृहाचे बांधकाम जेसीबी लावून पाडून टाकले. अधिकाऱ्यांवर वचक राहिला नसल्याचा आरोप नगरसेवक कैलास शिंदे यांनी केला आहे.