कल्याण-बिल्डर फसवणूक प्रकरणातील बेकायदा इमारती पाडण्याची कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी संबंधित प्रभाग अधिकारी वर्गास दिले होते. कारवाईत दिरंगाई केल्यास प्रभाग अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची तंबी आयुक्तांनी दिली होती. त्यांच्या आदेशानुसार बिल्डर फसवणूक प्रकरणातील इमारतीवर महापालिकेच्या कारवाई पथकाने बेकायदा असलेल्या चार मजली इमारतीवर हातोडा चालविला आहे.
महापालिकेच्या खोटय़ा सही शिक्क्याचा वापर करुन महापालिका हद्दीतील काही बिल्डरांनी महापालिकेची बांधकाम परवानगी मिळविल्याचे भासवून ही खोटी परवानगी रेरा प्राधिकरणास सादर केली. रेराकडून बांधकाम नोंदणी प्रमाणपत्र मिळविले. या प्रकरणाचा पर्दाफाश वास्तूविशारद संदीप पाटील यांनी केला. त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. महापालिकेने महापालिका आणि रेराची फसवणूक केल्या प्रकरणी 65 बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या बिल्डरांच्या बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले असताना त्यात दिरंगाई केली जात होती.
अखेरीस काल कल्याण पूर्व भागातील आडीवली ढोकळी येथील तळ अधिक चार मजली बेकायदा इमारत पाडण्यात आली. या इमारतीचा बिल्डर शिवसागर गुरुचरण यादव याने महापालिकेची खोटी परवावगी मिळवून त्या आधारे रेरा प्राधिकरणासह महापलिकेची फसवणूक केली. पोलिस बंदोबस्तात ही इमारत पोकलेन आणि ब्रेकरच्या सहाय्याने इमारत पाडण्यात आली. अन्य 64 बेकायदा इमारतीवर महापालिकेचे प्रभाग अधिकारी कधी कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महापालिकेच्या अधिका:यांनी दिरंगाई केल्यास त्यांना कारवाईस सामोरे जावे लागणार अशी तंबी आयुक्तांनी दिली आहे. बिल्डरांकडून रेरा आणि महापालिकेच्या फसवणूक प्रकरणातील अन्य बेकायदा इमारतीचा ठाव ठिकाणी मिळून येत नसल्याची लंगडी सबब अधिकारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.
अन्य ठिकाणाही कारवाई
डोंबिवली पश्चिम भागातील कुंभारखानपाडा परिसरात गुप्ता व अन्य जणांनी तळ अधिक पाच मजली बेकायदा बांधकाम केले होते. त्यावरही पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय दुर्गाडी गणोश घाट परिसरातील सीएनजी पंपालगत असलेल्या शेड जमीनदोस्त करण्यात आले. ही शेड विक्रम कापसे यांनी विनापरवानगी उभारली होती. शेड काढून टाकण्याची नोटिस बजावली होती. हा परिसर संवेदनशील असल्याने पोलिस बंदोबस्तात ही शेड पाडण्यात आली.