कल्याण-आत्तार्पयत परदेशातून प्रवास करुन कल्याण डोंबिवलीत २९५ जण आले आहेत. त्यापैकी ७१ जण हे अॅट रिस्क देशातील आहे. २९५ जणांपैकी १०९ जणांचे कॉन्टक्ट टेसिंग सुरु आहे. त्यांचा शोध महापालिकेकडून घेतला जात आहे अशी माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
आयुक्तांनी ही माहिती देण्यासाठी आज महापालिका आयुक्त दालनात एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. आयुक्तांनी सांगितले की, २९५ जणांपैकी ज्यांचे कॉन्टक्ट ट्रेसिंग झाले आहे. त्यापैकी ८८ जणांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आहे. ८८ जणांपैकी ३४ जणांची कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट निगेटीव्ह आली आहे. तर ४८ जणांचा रिपोर्ट अद्याप प्राप्त झालेला नाही. १०९ जणांचे कॉन्टक्ट ट्रेसिंग सुरु आहे. त्यांचा शोध सुरु आहे. त्यांचा पत्ता शोधला जात आहे. काही जणांच्या घराला कुलूप आहे. तर काहींचा फोन स्विच ऑफ येत आहे.
नायजेरीयातून सहा जण कल्याण डोंबिवलीत आले होते. त्यापैकी एकाच कुटुंबातील चार जण होते. त्यांची कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह आली होती. याशिवाय त्यांच्या संपर्कात आलेल्या चार जणांची कोरोना टेस्ट ही पॉझीटीव्ह आली आहे. त्यापैकी दोन जण हे कल्याण डोंबिवलीतील असून अन्य दोन जण हे हैद्राबाद येतील आहे. कल्याण डोंबिवलीतील दोन जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून हैद्रबादला दोन जणांच्या संदर्भात कळविण्यात आले आहे. या चारही जणांचे नमुने जिनोम सिक्वेसींगकरीता एनआयव्हीला पाठविण्यात आले आहे. त्यांचा रिपोर्ट येत्या चार दिवसा येणे अपेक्षित आहे. नाजयेरीयातून आलेले कुटुंब ज्या दुकानात गेले होते. त्या दुकानातील कर्मचा:याची आरटीपीसीआर टेस्ट केली आहे. त्याचबरोबर ज्या गाडीने ते आले त्या चालकाचीही आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आलेली आहे. याशिवाय नेपाळ आणि रशियातून आलेल्या दोन जणांना विलगीरण कक्षात ठेवले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे.
सरकारने दिलेल्या नियमानुसार महापालिकेने एसओपी तयार केली आहे. जे परदेशातून येतात. त्यांची यादी महापालिकेस प्राप्त होते. त्यांचा कॉन्टक्ट टेसिंग करुन त्याना तातडीने विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. त्यांची कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट केली जाईल. त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला तरी त्यांची आठव्या दिवशी पुन्हा कोरोना टेस्ट करुन पुन्हा त्यांना सात दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. विलगीकरण कक्षात ते कोरोना नियमावलीचे पालन करताहेत आहेत की नाही. यावर कॉल सेंटरच्या माध्यमातून वॉच ठेवला जाणार आहे. प्रसंगी सरप्राईज व्हीजीट केली जाईल. विलगीकरण कक्षात असताना त्यांनी नियमांचे उल्लंघन करुन नये अशा सूचना दिलेल्या आहेत. परदेशातून आलेल्या नागरीकांची माहिती स्वत: प्रवाशाने, तो राहत असलेल्या गृह निर्माण सोसायटीने आणि तो प्रवासी ज्या डॉक्टरकडे गेला त्यांनी महापालिकेस द्यावी असेही आवाहन आयुक्तांनी केले आहे.