प्रशांत मानेकल्याण : केडीएमसीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेमध्ये जाहीर करण्यात आलेल्या नियुक्त्यांवरून बेबनाव निर्माण झाला आहे. स्वार्थासाठी पक्ष सोडून जाणाऱ्यांना व निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुन्हा पक्षात येणाऱ्यांना मोठी पदे दिली गेल्याने कल्याण पूर्वेतील मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. त्यामुळे उपशहराध्यक्ष, विभागीय संघटक, विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, उपशाखाध्यक्ष, गट अध्यक्ष अशा एकूण ३२० पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे देत वरिष्ठांच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला आहे.
केडीएमसीच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोमाने कामाला सुरुवात केली आहे. मात्र, पूर्वेतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांत पदांच्या वाटपावरून नाराजी निर्माण झाली आहे. मनसेचे माजी नगरसेवक अनंता गायकवाड यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता पुन्हा त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे. तसेच त्यांची कल्याण पूर्व विधानसभाक्षेत्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह कल्याण पूर्व डोंबिवली, कल्याण ग्रामीणमधील सात ते आठ जणांना पदे दिली आहेत. परंतु, गायकवाड व अन्य एकाच्या नियुक्तीवरून नाराजी उफाळून आली आहे. पदे देताना आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही, असा आरोप अन्य पदाधिकाऱ्यांचा असून, त्यांनी त्यांचे राजीनामे उपशहर अध्यक्ष संजय राठोड यांच्याकडे दिले आहेत. राजीनामा देणाऱ्यांमध्ये १५ शाखाध्यक्ष, दोन विभागीय संघटक, चार विभाग अध्यक्ष, सहा उपविभाग अध्यक्ष, ५८ उपशाखा अध्यक्ष, तसेच २३४ गट अध्यक्ष आहेत.
उपशहराध्यक्षही नाराजउपशहराध्यक्ष संजय राठोड हेही नाराज असून ते सोमवारी शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्याकडे पदाचा राजीनामा सादर करणार आहेत. निष्ठावंतांना डावलून स्वार्थापोटी पक्ष बदलणाऱ्यांना मोठी पदे मिळत असल्याने आम्हा पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. अन्य पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडे राजीनामे सादर केले आहेत. देसाई यांची भेट घेऊन त्यांच्याकडे माझ्यासह सर्वाचे राजीनामे दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहराध्यक्षांकडून प्रतिसाद नाहीपदाधिकाऱ्यांच्या नाराजीबाबत शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्याशी ‘लोकमत’ने मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
राजीनाम्यांबाबत मला काहीही कल्पना नाही. पक्षश्रेष्ठी राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी मला पुन्हा पक्षात प्रवेश दिला आहे. ज्यांनी राजीनामे दिले आहेत त्यांनी पदावर असताना कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात काय काम केले, पक्ष संघटना वाढविण्यासाठी कोणते प्रयत्न केले हादेखील माझा सवाल आहे. - अनंता गायकवाड, माजी नगरसेवक, विधानसभा कल्याण पूर्व अध्यक्ष