कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिकेतील घनकचरा विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांनी आजपासून काम बंद आंदोलन पुकारले नियमितपणे पगार मिळत नसल्याने कामगारांनी अनेकदा महापालिका प्रशासनाकडे दाद मागितली मात्र कार्यवाही होत नाही. अखेर आज या कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.
मनसे कामगार सेनेने देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. महापालिकेत घनकचरा विभागात कार्यरत असलेले सुमारे ६५० पेक्षा जास्त कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने शहरात कचरा प्रश्न उद्भवण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
खासगी कंत्राटदारांमार्फत शहरातील कचरा उचलण्याचे काम केले जाते. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळत नसल्याच्या मुद्द्यावर मनसेने काही दिवसांपूर्वीच महापालिका प्रशासनाच्या विरोधात मुख्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी दर महिन्याच्या १० तारखेला या कर्मचाऱ्यांना वेतन मिळेल असे लेखी आश्वासन महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी दिले होते. मनसे कामगार सेनेच्या उल्हास भोईर यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांचे गेल्या ३ महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही.
गेल्या महिन्यात गणेशोत्सव झाल्यानंतर या कामगारांना वेतन देण्यात आले होते. तर ऑक्टोबर महिन्यापासून प्रत्येक १० तारखेला वेतन दिले जाईल असे लेखी देऊनही आज ११ तारीख आली तरी अद्याप वेतन मिळले नसल्याची माहिती उल्हास भोईर यांनी दिली आहे. आजपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नाही. तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचेही भोईर यांनी सांगितले. त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर शहरात कचऱ्याची समस्या समस्या उद्भवू शकते. दरम्यान याबाबत उपायुक्त अतुल पाटील यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.