लोकमत न्यूज नेटवर्क :कल्याण
पर्यावरण दिनानिमित्त शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांची लगबग सुरू आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनेही पर्यावरण दिनाचं औचित्य साधून जनजागृतीसाठी एक पाऊलं पुढे टाकलं आहे. आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून 5 आणि 6 जून रोजी भव्य प्रदर्शन आणि सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.
माझी बाग, माझा परिसर या विषयाच्या अनुषंगाने फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेतील विजेत्या 3 स्पर्धकांना 5 जून रोजी सकाळी 10 वाजता स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे त्याप्रमाणे सहभागी स्पर्धकांचा देखील प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात येणार असल्याचे आयुक्त सूर्यवंशी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगीतले.महापालिका परिक्षेत्रातील नागरिकांनी कल्याण डोंबिवली निसर्गोत्सव २०२२ मधे सहभागी होऊन महापालिकेतील हरित प्रदर्शनाला व विविध कार्यक्रमांना जास्तीत जास्त प्रतिसाद दयावा असे आवाहन करण्यात आले आहे.
असा साजरा होणार निसर्गोत्सव
- 5 जूनला सकाळी 6.30 वाजता महापालिकाक्षेत्रातील दानशूर व्यक्तींकडून तसेच- विविध सामाजिक संस्थाकडून प्राप्त झालेल्या सायकली महापालिकेच्या शाळांमधील गरजू विदयार्थ्यांना मोफत वितरीत करण्यात येणार आहेत
- त्यानंतर सकाळी 7 वाजता महापालिका परिक्षेत्रातील नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत व शारिरिक स्वाथ्य राखण्याबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातून कल्याण व डोंबिवली शहरामध्ये सायकल रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.
- त्याप्रमाणे महापालिकेच्या मुख्यालयातील तळ मजल्यावरील मोकळ्या जागेत भव्य अशा "कल्याण डोंबिवली निसर्गोत्सव २०२२ प्रदर्शनाचे"*आयोजन करण्यात आले आहे सदर प्रदर्शनाचे उदघाटन दि. 5 जून रोजी सकाळी 10 वाजता महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे हस्ते करण्यात येणार आहे.
- हे प्रदर्शन 5 जून व 6 जून सकाळी 10 ते रात्री 8. वाजेपर्यंत महापालिका परिक्षेत्रातील नागरिकांसाठी विनाशुल्क खुले राहणार आहे.
या प्रदर्शनामध्ये रोपांची काळजी कशी घ्यावी, स्वयंपाक घरातील कच-यापासून खत निर्मिती, विविध आयुर्वेदिक रोपांची माहिती, लँडस्केप ट्रे, किचन गार्डनिंग, इ. विषयक माहिती तसेच महापालिका परिक्षेत्रातील निवडक नर्सरी कडून विविध रोपांची माहिती व स्वस्त दरात विक्री असे अनेकविध उपक्रम राबविले जाणार आहेत त्याप्रमाणे दि. 5 व 6 जून या दोन्ही दिवशी सायंकाळी 5 ते 6 व 6 ते 7 या कालावधीमध्ये पर्यावरणातील तज्ञ व्यक्तींमार्फत मार्गदर्शनही केले जाणार आहे.