ठाणे : भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयामार्फत 25 ऑगस्टरोजी भारतातील 100 स्मार्ट सिटींसाठी विविध गटात 'कोविड-१९ इन्होवेशन 'स्मार्ट सिटी ॲवार्ड स्पर्धा' घेण्यात आली होती. या स्पर्धेच्या दुस-या टप्प्यातील एकुण 40 शहरांमधून याकोविड इन्होवेशन अवॉर्डसाठी फक्त वाराणसी, कल्याण डोंबिवली , वडोदरा, आग्रा या 4 शहरांची निवड झाली होती. यापैकी भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाचे राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज शुक्रवारी वाराणसी आणि कल्याण डोंबिवली यांना संयुक्तपणे विजेते घोषित केले,असे ठाणे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
केंद्र शासनाने या स्पर्धेसाठी टप्पेनिहाय पारितोषिकांसाठी वेगवेगळी संवर्गात निवड प्रक्रिया जाहिर केली होती. स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंन्ट कार्पोरेशन लिमिटेडने या स्पर्धेत महापालिकेच्या वतीने 'कोविड इन्होवेशन अवॉर्ड' या गटासाठी नामांकन सादर केले होते. एकुण निवड प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात सर्व शहरातील स्मार्ट सिटी कंपन्यांच्या एकंदरीत कामगिरीसाठी बाद फेरी तत्वाप्रमाणे काही निकष ठरविण्यात आले होते. या स्मार्ट सिटी कार्यक्रमाअंतर्गत सन 2016 पासून विविध टप्प्यांमध्ये एकुण 100 शहरांची निवड केली होती. यातील पहिल्या टप्प्यात 20, दुस-या टप्प्यात 40, तिस-या टप्प्यात 30 आणि अखेरच्या टप्प्यात 10 शहरांचा अंतर्भाव होता.यातील निवडीचे निकष हे मुख्यत: केलेल्या कामाच्या गुणवत्तेशी निगडीत होते. या दुस-या टप्प्यातील *एकुण 40 शहरांमधून कोविड इन्होवेशन अवॉर्डसाठी फक्त वाराणसी, कल्याण डोंबिवली, वडोदरा, आग्रा या 4 शहरातून आज वाराणसी आणि कल्याण डोंबिवली यांना संयुक्तपणे विजेते घोषित केले आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मिळालेले हे ॲर्वाड म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नागरिकांचा सन्मान आहे, कोविड कालावधीत महापालिकेल्या मदत करणा-या असंख्य डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच अन्य विभागातील अधिकारी, कर्मचारी , अनेक सेवाभावी संस्था, सर्व लोकप्रतिनिधी यांच्या हा सन्मान आहे. कमी संसाधनामध्ये महापालिकेने या सगळयांच्या सहकार्याने चांगला लढा दिला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली.सांघिक भावनेने संकटाचा मुकाबला करण्याची या शहराने जोपासलेल्या संस्कृतीची केंद्र शासनाने दखल घेतली असून अशीच कार्यपध्दती यापुढीही सुरु राहिल्यास आपण सर्व मिळून खूप प्रगती करु असा विश्वास सूर्यवंशी व्यक्त केला.