कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेतील कर्मचाऱ््यांना दिवाळीचा बोनस २५ हजार रुपये देण्यात यावा अशी मागणी म्युन्सीपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आज महापालिका आयुक्त डा. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली.या भेटीच्या वेळी म्युन्सीपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाळ हरदास यांच्यासह पदाधिकारी सचिन बासरे, तात्या माने, अजय पवार, सुनिल पवार, सुरेश तेलवणे, रमाकांत जोशी, धjर्मेंद्र गोसावी आदी उपस्थित होते. मागच्या वर्षीही युनियनच्या वतीने २५ हजार दिवाळी बोनस देण्यात यावा अशी मागणी केली. मागच्या वर्षी कामगारांना १७ हजार ५०० रुपये बोनस दिला होता. महापालिकेची आर्थिक स्थिती मागच्या वर्षी ठिक नव्हती. त्यामुळे मागितलेल्या बोनसच्या रक्कमेपैकी १७ हजार ५०० रुपये बोनस दिला गेला होता. यंदा महापालिकेची स्थिती चांगली आहे. त्यामुळे मागणीच्या रक्कमेच्या आसपास बोनस मिळणार असल्याची आशा कामगारांसह युनियनला आहे. चांगला बोनस देण्यात येईल असे आयुक्तांनी युनियनला आश्वासित केले आहे. या व्यतिरिक्त कामगारांच्या अन्य विविध मागण्यावर आयुक्तांसोबत चर्चा करण्यात आली आहे. या मागण्या पूर्ण करण्यावर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आश्वासीत प्रगती योजनेचा लाभ कामगारांना देण्यात यावा. स्वच्छता निरिक्षक सेवा बजावित असलेल्या कर्मचाऱ्यांना स्वच्छता निरिक्षक पदावर समाविष्ट करण्यात यावे. अनुकंपा तत्वावरील वारसांना कामावर घेण्याची प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावीत. सेवा निवृत्त कामगारांना ६ व्या आणि ७ व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम दिली जावी. हजेरी शेडवरील कामगारांना सोयी सुुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. मंजूर आकृतीबंधा प्रमाणे पदभरती प्रक्रिया राबविली गेली पाहिजे या विविध मागण्यावर चर्चा करण्यात आली.
केडीएमसीच्या कामगारांना हवा आहे २५ हजार रुपयांचा बोनस
By मुरलीधर भवार | Published: November 01, 2023 3:42 PM