कल्याण - कोरोना लसीकरणापासून वंचित राहणाऱ्यांना लस देण्याकरीता कल्याण डोंबिवली महापालिकेने राज्य सरकारच्या आदेशानुसार हर घर दस्तक मोहिम सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत महापालिकेने आत्तापर्यंत ४५ हजार ९०१ जणांना कोरोना लसीचा डोस दिला आहे. हर घर दस्तक मोहिमे अंतर्गत कोरोना लसीचा पहिला डोस ७ हजार ६९५ जणांना देण्यात आला आहे. तर दुसरा डोस ३८ हजार २०६ जणांना देण्यात आला आहे.
जानेवारी महिन्यापासून सुरू असलेल्या लसीकरण मोहिमे अंतर्गत महापालिका क्षेत्रात आत्तापर्यंत पहिला डोस ९ लाख २१ हजार ८८९ जणांना देण्यात आला आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 5 लाख २६ हजार ४६२ आहे. पहिला आणि दुसरा डोस मिळून एकूण १४ लाख ४८ हजार ३५१ जणांना देण्यात आला आहे. महापालिकेने नवरात्री उत्सवात कवच कुंडल मिशन राबविली. तसेच युवा स्वास्थ कोविड मिशनही राबविली आहे.
१०० टक्के नागरीकांना पहिला डोस देण्याचे लक्ष्य ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष महापालिकेने डोळ्य़ासमोर ठेवले आहे. लस देण्याकरीता येणाऱ्या पथकाच नागरीकांना सहकार्य करावे. कोणी लस घेतली नसल्यास त्याची माहितीही पथकास द्यावी असे आवाहन महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी केले आहे.