कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मोहिली येथील २७५ दक्ष लक्ष लिटर क्षमतेच्या उदंचन केंद्राचा ऑनलाईन भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते १९ जानेवारी रोजी होणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकार यांच्यासह महापालिका निधीतून अमृत योजनेतून मोहिली उंदचन केंद्र बाधले जाणार आहे. त्याचा भूमीपूजन सोहळा दृश्यप्रणाली द्वारे अत्रे रंगमंदिरात पाहता येणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील उपस्थित राहणार आहेत. मोहिली केंद्रामुळे बारावे येथील १४४ दश लक्ष लिटर जलशुध्दीकरण केंद्र, गौरीपाडा येथे नव्याने बांधण्यात येणा-या ९५ दक्ष लक्ष लिटर केंद्रातून महापालिका क्षेत्रातील सुमारे २२ लाख नागरीकांना तसेच भविष्यात २०५५ सालापर्यंत भविष्यातील लोकसंख्या वाढ गृहित धरुन पाणी पुरवठा सुरळित होणार आहे.
मोहने उदंचन केंद्र ४० वर्षे जुने आहे. नव्या मोहने उदंचन केंद्राच्या देखभाल दुरुस्ती आणि जलशुध्दीकरणावर होत असलेल्या ७५ लाख ते एक कोटी रुपयांचा खर्चाची बचत होणार आहे. मोहिली गावाजवळ पाण्याची पातळी खोल आहे. पाणी स्वच्छ असल्यामुले नागरिकांना पुरेसा शुध्द पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर महापालिका हद्दीतील नव्याने विकसित होत असलेल्या भागाला पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे.