कल्याण-कचरामुक्ती कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरीकांचा सहभाग वाढावा याकरीता त्यांना प्रेरित करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने नवा फंडा शोधला आहे. महापालिकेने कचरामुक्त तारांकित सोसायटी स्पर्धेचे आयोजन केले आहे. उत्कृष्ट सोसायटीची निवड करण्यात येणार आहे. उत्कृष्ट सोसायटयांना रोख पुरस्कार, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविले जाणार आहे. ही संकल्पना महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांची असून महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापनाकडून राबविली जाणार आहे.
यामध्ये सोसायटीत करण्यात येणारे दैनंदिन कच-याचे वर्गीकरण, सोसायटी आवारात दैनंदिन स्वरुपात करण्यात येणारी स्वच्छता, सोसायटी मध्ये राबविण्यात येणारे ओल्या कच-यावरील सेंद्रिय खताचे प्रकल्प, सोसायटी मध्ये एकल वापर प्लॅस्टिक बंदीची १०० टक्के अंमलबजावणी करणे, सोसायटी परिसर आणि सोसायटी समोरील अथवा बाजूच्या रस्त्यालगत अथवा सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड करणे, सोसायटीच्या इमारतीवर पावसाच्या पाण्याचे रेन वॉटर हार्वस्टिंग करणे, सोसायटीच्या इमारतीवर सौर उर्जा प्रकल्प (सोलर वॉटर हिटर सोलर एनर्जी सिस्टम उभारणे, सोसायटी पार्किंग परिसर आणि पावसाचे पाणी वाहून नेणारे छोटे नाले आणि वाहिन्या स्वच्छ असणे, मॅटेनन्स स्टाफ आणि व्यावसायिक गाळेधारक दुकानदार आणि कामगार यांच्यासाठी कॉमन सोसायटी शौचालयाची व्यवस्था असणे तसेच सोसायटी मधील इलेक्ट्रीक वाहनांची संख्या या मुद्यांचा अंतर्भाव आहे.
या स्पर्धेसाठी २० ते ३१ जानेवारी या कालावधीत अर्ज स्विकारले जातील. स्पर्धेचा कालावधी १ ते ३१ मार्च हा असेल. साेसायटीचे फिल्ड असेसमेंट १ ते १५ एप्रिल दरम्यान केले जाणार आहे. तळ अधिक सहा त्यापेक्षा कमी मजली इमारतीस प्रथम पुरस्कार १५ हजार, द्वितीय पुरस्कार १० हजार आणि तृतीय पुरस्कार ५ हजार रुपये असेल. तळ अधिक सात मजली त्यापेक्षा कमी असलेल्या इमारती आणि १७ मजली त्याहून उंच इमारतींनाही उपरोक्त क्रमांकानुसार रोख रक्कमेचे बक्षिस असेल.
या स्पर्धेत जास्तीत जास्त सोसायटयांनी सहभाग घेवून शहर स्वच्छ व सुंदर करण्याससहकार्य करावे असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी केले आहे.