कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता, रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळणे कठीण होत आहे. ऑक्सिजनचा पुरवठाही मर्यादित आहे. यावर मात करण्यासाठी महापालिका हवेतून ऑक्सिजन वेगळा करण्याचे दोन प्लांट उभारणार आहे. त्याची निविदा नुकतीच महापालिकेने काढली आहे. हे दोन्ही प्लांट मे महिन्यात सुरू होतील, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
पालिकेची सात आणि ८७ खासगी कोविड रुग्णालये आहेत. या रुग्णालयांना ५० टन ऑक्सिजन मिळतो; मात्र तो पुरेसा नाही. महापालिकेने दोन ऑक्सिजन प्लांट टाकण्यासाठी निविदा काढली आहे. एका प्लांटची क्षमता दिवसाला २०० जंबो सिलिंडर ऑक्सिजन तयार करण्याची आहे. एक प्लांट रुक्मिणी प्लाझा, तर दुसरा शक्तिधाम येथील कोविड सेंटर येथे उभारला जाणार आहे.
हवेतील ऑक्सिजन वेगळा करण्याचे हे प्लांट आहेत. एका प्लांटचा खर्च किमान दीड कोटी रुपये इतका आहे. दोन्ही प्लांटवर मिळून एकूण तीन कोटी खर्च होणार आहे. तूर्तास महापालिकेच्या निधीतून हे प्लांट उभारले जाणार असले, तरी त्याला राज्य सरकारकडून निधी मिळणार आहे. या प्लांटपैकी एक हा १० मे पर्यंत सुरू होऊ शकतो, तर दुसरा मे अखेर सुरू केला जाणार असल्याची हमी कंत्राटदाराने दिली आहे.
खासगी रुग्णालयांनीही प्लांट उभे करावेत
खासगी कोविड रुग्णालयांशी शनिवारी महापालिका आयुक्तांनी ऑनलाईन संवाद साधला. खासगी रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णालयातील बेड क्षमतेनुसार ऑक्सिजन प्लांट सुरू करावेत, अशी सूचना आयुक्तांनी केली. एका प्लांटसाठी किमान ३० ते ४० लाख रुपये खर्च येतो. हा खर्च खासगी रुग्णालयांकरिता फार मोठा नाही. त्यांनी प्लांट सुरू केल्यावर तो केवळ कोविड रुग्णालयांसाठीच नव्हे, तर कायमस्वरुपी उपयुक्त ठरणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. काही खासगी रुग्णालयांनी प्लांट सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे.