कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिकेची प्रभाग रचना जाहीर होण्याआधीच शिवसेनेचे उमेदवार ठरलेले आहेत. ते कोणाला घेऊन कसे चालले आहेत. त्यांचे कार्यक्रम पाहता, प्रभाग रचना आधीच फुटली होती असा गंभीर आरोप मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केला आहे. सत्ता शिवसेनेची आहे, त्यामुळे जिसकी लाठी उसकी भैस या म्हणीप्रमाणे शिवसेनेने त्यांच्या मनाप्रमाणे, निवडणूकीसाठी त्यांना जी सोयीची होईल, अशी प्रभाग रचना केल्याचा गंभीर आरोपही पाटील यांनी केला.
महापालिकेत मनसे हा नंबर दोनचा मोठा पक्ष होता. मात्र मनसे तत्वे विकून सत्तेत बसली नाही. तत्वे विकून सत्तेसाठी दुसऱ्यांसोबत गेली नाही. त्यांनी कितीही प्रभाग रचना फोडली तरी फोडू द्या. त्याने मनसेला काही फरक पडणार नाही. मनसे मुद्दे घेऊन सकारात्मक विषय घेऊन निवडणुकांना समोरी जाणार आहे. त्यामुळे लोक मनसेला मतदान करतील. निवडणूकीच्या तोंडावर घोषणा केल्या जातात. त्यापैकी किती घोषणा पूर्ण होता, हे देखील महत्वाचे आहे. त्यामुळे लोकांनी स्वत:चे डोके लावावे. भावनिक होण्यापेक्षा प्रॅक्टीकल व्हावे, असे आवाहन मनसे आमदार पाटील यांनी केले आहे.
मनसे फायदा तोटा पाहून निवडणूका लढवित नाही. जनतेच्या प्रश्नावर निवडणूका लढविते. त्यामुळे लोक ठरवितील काय करायचे ते. एका पेपरमध्ये लोकग्राम पादचारी पूलाची निविदा काढण्यात आल्याचा बातमी वाचली. खरे पाहता अजून निविदाच निघालेली नाही. त्यामुळे नेमके खरे काय आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित करीत निवडणूका आल्यावर बैठका घेऊन माहिती दिली जाते अशी टिका खासदारांचा नामोल्लेख न करता शिवसेनेवर केली.