लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून शून्य कचरा मोहिमेचा डिंगोरा पिटवला जात असला तरी ही मोहीम ठोस कृतीविना कागदावरच राहिल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकुर्लीतील कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्यावर गेले दोन दिवस साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा पडलेला खच पाहता प्लास्टिकबंदीलाही हरताळ फासला गेल्याचे स्पष्ट होत आहे.
ठाकुर्लीतील कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्ता आणि ९० फुटी रोड या एकेकाळी सुस्थितीत असलेल्या रस्त्यांची खोदकामांनी पुरती वाताहत झाली आहे. या दोन्ही रस्त्यांवरून वाहने चालविणे जिकिरीचे बनले आहे. त्यातच या परिसरात जागोजागी उघड्यावर स्थानिकांकडून कचरा टाकला जात आहे. त्यामुळे खड्डेमय रस्त्यांसह कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रासही पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना सोसावा लागत आहे.
गेले दोन दिवस रस्त्याच्या बाजूला पडलेला कचरा केडीएमसीकडून उचलला न गेल्याने ढीग साचून कचरा रस्त्यावर आल्याचे चित्र या दोन्ही रस्त्यांवर ठिकठिकाणी दिसून येत आहे. तसेच या कचऱ्यात प्लास्टिकचा भरणा अधिक आहे. त्यामुळे आज प्लास्टिकचा वापर नागरिकांकडून सर्रासपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या सर्वच प्रभागांमध्ये आरोग्य निरीक्षकांतर्फे कारवाई सुरू असल्याचा तसेच प्लास्टिकबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू असल्याचा दावा दरवेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून केला जातो. परंतु, दावा फोल ठरला आहे.
यंदा दिवाळीत मोहीम नाही?- सध्या शून्य कचरा मोहिमेंतर्गत ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी विशिष्ट दिवस ठरविले आहेत. परंतु, आजही घरातील कचरा हा रस्त्यावरच पडत असल्याने ही मोहीम कृतीविना अद्याप कागदावरच आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.- येथील मोठ्या संकुलांच्या बाहेरील कचऱ्याचे डबे तुडुंब भरून वाहत आहे. दरवर्षी दिवाळीत मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा फटाक्यांचा कचरा पाहता मनपाकडून शून्य कचरा मोहीम राबवली जाते. परंतु, यंदा तसे चित्र पाहायला मिळाले नाही.