डोंबिवली- डोंबिवली पुर्व, मानपाडा रोड येथील वसंत भोईर यांच्या मालकीची 'वसंत भोईर बिल्डींग' ही अतिधोकादायक इमारत दिनांक 9 जुलै ते 11 जुलै या कालावधीत महानगरपालिकेमार्फत निष्कासीत करण्यात येणार आहे. निष्कासनाच्या वेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने केळकर रोड वाहतुकीसाठी बंद करणे आवश्यक असल्याबाबतचे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने डोंबिवली वाहतूक शाखेला कळवले आहे. त्यामुळे या कालावधीत वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आले आहे.
9 ते 11 जुलै या कालावधीत संबंधित ठिकाणी गर्दी होऊ नये किंवा अपघात होऊ नये म्हणून 9 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून ते 11 तारखेपर्यंत संध्याकाळी 8 वाजेपर्यंत मानपाडा रोड वरील गावदेवी मंदीर ते आयकॉन हॉस्पिटल चे दिशेने जाणारा रस्ता गावदेवी मंदीरासमोर सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद करण्यात आला आहे. डोंबिवली वाहतुक उप विभागातर्फे नागरीकांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
चार रस्ता, मानपाडा रोड, डोंबिवली पुर्व वरुन गावदेवी मंदीराचे दिशेने जाणारी सर्व जड-अवजड वाहनांना गावदेवी मंदीरा कडे प्रवेश बंदी करण्यात येत असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उमेश गीते यांनी सांगितले. तर पर्यायी मार्ग म्हणून सदरची वाहने ही संत नामदेव पथ मार्गे डाव्या बाजूस वळण घेवून गोग्रासवाडी आईस फॅक्टरी- शिवाजी उद्योग नगर मार्गे ईच्छित स्थळी जातील. तसेच गावदेवी मंदीराचे दिशेने जाणारी सर्व प्रकारची हलकी वाहने (दुचाकी, चारचाकी वाहने) यांना गावदेवी मंदीर येथून वळण देवून त्या आयकॉन हॉस्पिटल ते चार रस्ता कडे येणा-या वाहीनी वर एका लेन वर वळवून पुढे आयकॉन हॉस्पिटल समोरील नियमीत मार्गाने जातील असेही सांगण्यात आले आहे.