अभिनेत्री केतकी चितळे हिने केलेली पोस्ट अत्यंत घाणेरडी होती अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी दिली आहे. कल्याणमध्ये मूकनायक ते प्रबुद्ध भारत कार्यक्रमासाठी आज सुजात आंबेडकर आले होते. सोशल मीडियाचा वापर सर्वांनी लक्षपूर्वक करण्याची आवश्यकता आहे. सध्या जे काही ट्रोलिंग होतं, त्यामुळे नेत्यांच्या मेंटल हेल्थलाही त्रास होऊ शकतो. केतकी चितळेचं वक्तव्य अतिशय घाणेरडं आणि चुकीचं असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करायचा असेल, तर धोरणांवर, भूमिकांवर, राजकारणावर टीका करा. मात्र कुणाच्या अंगावर, दिसण्यावर नाही, असं सुजात आंबेडकर म्हणाले.
शरद पवार यांना महाराष्ट्रभर आदर असून त्यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य शोभनीय नव्हतं. जगभरातल्या कॅन्सर पेशंट्ससाठी शरद पवार हे प्रेरणा आहेत, कारण कॅन्सरवर मात करून ते या वयातही इतकं बोलतात, लोकांना भेटतात, भाषणं करतात, त्यामुळं त्या नेत्याबद्दल असं बोलणं चुकीचं असल्याचं सुजात आंबेडकर म्हणाले. तर मीडियाने सध्या प्रश्न आणि उत्तर सभा सोडून महाराष्ट्रात टँकर विक्री किती वाढली आहे? यावर रिपोर्ट करावा, असा सल्ला त्यांनी दिला. दरम्यान, सुजात आंबेडकर यांनी यावेळी राजकारण्यांच्या भांडणात समाजाच्या प्रश्नांकडे माध्यमांचं दुर्लक्ष होत असल्याचं सांगितलं.