- अनिकेत घमंडीलोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : सुरेखा (नाव बदलले आहे) डोंबिवलीला दरवाजात उभी राहायची व गाडी मुंब्रा स्टेशनच्या जवळ पोहोचल्यावर तिच्या छातीत धडधड सुरू व्हायची. मुलांचे एक टोळके मुंब्र्याला चढल्यापासून सुरेखा मुलुंडला उतरेपर्यंत शेरेबाजी, अश्लील हावभाव करून तिला हैराण करायचे. राधिका (नाव बदलले आहे) दादरला लोकल पकडायची. एक तरुण त्याच डब्यात लोकल पकडायचा आणि ठाण्यात उतरलेल्या राधिकाचा पाठलाग करायचा. ‘खाकीतील सखी भरोसा करके तो देखो’ या अभियानात त्यांनी लोहमार्ग पोलिसांकडे व्हॉट्सॲपद्वारे तक्रार केली. त्यानंतर मुंब्र्यातील त्या टोळक्याला सुरेखाच्या समक्ष पोलिसांनी चौदावे रत्न दाखवले तर पाठलाग करणारा तो तरुण चार दिवसानंतर पुन्हा दिसला नाही.
रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पोलिसांचा आधार वाटावा, अडीअडचणीच्या काळात संपर्क करता यावा, या उद्देशाने मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या संकल्पनेतून ‘खाकीतील सखी भरोसा करके तो देखो’ हे अभियान सुरू केले. वर्षभरात महिला प्रवाशांची छेडछाड करण्याच्या, त्यांचा पाठलाग करण्याच्या ५०९ तक्रारी प्राप्त झाल्या. या प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन कारवाई केली.
महिला प्रवाशांना खटकणारी गोष्ट व्यक्त करता यावी, यासाठी महिला पोलिस अधिकारी, अंमलदार या प्रवासी महिला आणि रेल्वे पोलिस यातील दुवा बनल्या. त्यांनी ४८३ व्हॉट्सॲप ग्रुप बनवले. त्याद्वारे ९,२७३ महिला जोडल्या. महिलांची तक्रार, अडचण त्यांनी व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज करून कळवली की, त्वरित मदत केली जाते. मध्य आणि पश्चिम रेल्वे आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या १७ पोलिस ठाण्यांत कोणत्या पोलिस ठाण्याची जबाबदारी कुठल्या महिला अधिकाऱ्याकडे आहे, याची माहिती उपलब्ध आहे.
आतापर्यंत ८३ गुन्ह्यांची नोंदमहिला सुरक्षेकरिता रेल्वेने उपलब्ध केलेल्या १५१२ या हेल्पलाईनवर वर्षभरात एकूण ४२ हजार ८९८ कॉल प्राप्त झाले. त्या सर्वांचे निराकरण करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी आतापर्यंत ८३ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. एकूण कॉलपैकी नऊ हजार २२८ महिलांचे कॉल होते. त्यामधील काही तक्रारींची दखल घेऊन २९ जणांवर गुन्हे नोंदविण्यात आल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.
महिला प्रवाशांना आवाहन करतो की, अधिकाधिक महिलांनी ‘खाकीतील सखी’ या अभियानात सहभागी होण्यासाठी जवळच्या रेल्वे पोलिस ठाण्याशी संपर्क करून तेथील महिला अधिकारी, अंमलदार यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी व्हावे. जेणेकरून समस्या आल्यास ती तत्काळ सोडवण्यास सहाय्य होईल.डॉ. रवींद्र शिसवे, आयुक्त, मुंबई लोहमार्ग पोलिस