प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांचे पती विजय यांना ज्योतिष सांगण्याच्या बहाण्याने खुर्चीला बांधून तिघांनी लुबाडल्याची घटना २४ सप्टेंबरला घडली होती. या गुन्हयातील फरार दोन आरोपींनाही अटक करण्यात मानपाडा पोलिसांना यश आले. २० लाख रूपयांच्या खंडणीसाठी विजय यांचे अपहरण झाले होते. दीड महिन्यांपूर्वीच अपहरणाचा कट शिजला होता.
विजय हे केबल व्यावसायिक आहेत. तुम्ही सतत आजारी पडता, माझ्या ओळखीचा ज्योतिष आहे. तो तुमचा हात बघून तुम्हाला उपाय सांगेल, अशी बतावणी करत परिचित असलेल्या गिरीश खैरे याने विजय यांना आडिवली येथील चैतन्य पार्क मध्ये भाडयाने घेतलेल्या खोलीत नेले. तेथे अन्य दोघेजण होते. खैरे तेथून निघून गेल्यावर दोघांनी विजय यांना खूर्चीला बांधून त्यांच्याकडे २० लाख रूपयांची खंडणी मागितली. दोघांपैकी एकाने विजय यांच्या घरी जावून त्यांचा अपघात झाला आहे. तत्काळ चला असे सांगितले. परंतू रचलेला कट यशस्वी होत नाही असे कळताच पुन्हा चैतन्य पार्क गाठून विजय यांच्या जवळील मोबाइल, रोकड हिसकावून दोघेही तेथून पसार झाले. विजय यांनी स्वत:ची कशीबशी सुटका करून घेत पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दिली होती.
लिफ्ट ऑपरेटर बनला ज्योतिषी
या गुन्ह्यातील आरोपी गिरीष खैरे याचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. त्याला तत्काळ अटक केली होती. तर फरार असलेल्या विनयकुमार कृष्ण यादव उर्फ राघव ( वय २२ ) आणि विनायक किसन कराडे ( वय ३५ ) या दोघांना कल्याण पुर्वेकडील कोळसेवाडी, तिसगाव नाका, चक्कीनाका येथून अटक केली. ज्योतिष सांगण्याचा बहाणा करणारा कराडे हा लिफ्ट ऑपरेटर आहे तर डोक्याला पिस्तुल लावून धमकावणारा विनयकुमार हा प्लंबर आहे. त्यानेच बिहार येथून १५ हजार रूपये किमतीला गावठी कट्टा ( पिस्तूल) खरेदी केला होता. अटक आरोपींकडून देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतुस आणि तीन मोबाईल असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.