कल्याण-शहराच्या पूर्व भागातील खडेगोळवली परिसरात राहणाऱ््या एका विधी संघर्षित अल्पवयीन मुलाची एका टोळक्याने हत्या केल्याची घटना काल रात्री घडली आहे. प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. मुकेश उर्फ विठ्ठल काण्या आणि निरज दास अशी दोन जणांनी नावे आहेत. तर दोन जण हे अल्पवयीन आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.
ज्या विधी संघर्षित अल्पवयीन मुलाची हत्या झाली. त्याच्या विरोधात कोळसेवाडी पेालिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तो विधी संघर्षित बालक असल्याने त्याला साेडण्यात आले होते. त्यानंतर त्याचे एका अल्पवयीन मुलासोबत भांडण झाले होते. त्यात तो अल्पवयीन मुलगा जखमी झाला होता. या भांडणाचा राग मनात धरुन त्याचा बदला घेण्यासाठी विधी संघर्षित अल्पवयीन मुलाचे अपहरण केले. त्याला एका ठिकाणी नेऊन त्याठिकाणी लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्याची तक्रार देण्यासाठी विधी संघर्षित अल्पवयीन मुलगा हा पोलिस ठाण्यात आला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या हत्या प्रकरणातील फिर्यादीत फिर्यादाने १२ जणांची नावे दिली आहे. त्यापैकी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उर्वरीत आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र देशमुख करीत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली आहे.
कल्याण पूर्वेत अभिजीत कुडळकर आणि विशाल उर्फ दही दोन जणांच्या गॅंग आहेत. हे दोघेही जेलमध्ये आहे. या दोन गॅंगच्या हस्तकांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरु आहे. त्यातून ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे.कल्याण डोंबिवली महापालिकेचे भाजप माजी महापौर विक्रम तरे यांच्या निकटवर्तीय असलेल्या आकाश जैस्वाल यालाही पोलिसांनी चौकशीकरीता ताब्यात घेतले आहे.