डोंबिवली : शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा कोपर उड्डाणपूल येत्या पावसाळ्यापूर्वी बांधून पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने रेल्वे मार्गांवरील पुलाच्या टप्प्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले गर्डर दोन दिवसांत डोंबिवलीत आणण्यात येणार आहेत. त्यानंतर ते पुलावर बसवण्यात येतील, अशी माहिती आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली.
कोपर उड्डाणपूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे पूर्व-पश्चिम येजा करणारी वाहतूक ठाकुर्लीतील नवीन उड्डाणपुलावरून वळवण्यात आली होती. कोपर उड्डाणपूल जवळपास २० महिने बंद असल्याने डोंबिवली शहराची पूर्व-पश्चिमेची वाहतूक व्यवस्था पुरती कोलमडली आहे. त्यामुळे पश्चिमेतील नागरिक पुरते हैराण झाले आहेत. मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात रेल्वे वाहतूक बंद असताना हा पूल पाडण्यात आला.
कोपर पूल लवकर मार्गी लागावा, यासाठी भाजपतर्फे स्थानिक पातळीपासून केंद्रीय स्तरावर कायम पत्रव्यवहार, पाठपुरावा सुरू ठेवल्याचे चव्हाण म्हणाले. लवकरात लवकर पुलाचे काम पूर्ण करून डोंबिवलीला वाहतूक कोंडीतून दिलासा द्यावा, यासाठी पाठपुरावा सुरू राहील असेही ते म्हणाले. दरम्यान, पूर्व-पश्चिमेला जाेडणारऱ्या ठाकुर्ली उड्डाणपुलाचे कल्याण दिशेकडील रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून हाेत आहे. दाेन्ही पूल मार्गी लागल्यास वाहतूककाेंडी कमी हाेईल.