- मयुरी चव्हाण कल्याण क्राईम ब्राँचने कल्याण पुर्वेतील हाजीमलंग रोड येथील एका बार वर कारवाई केली असल्याच वृत्त ताज असताना पुन्हा एकदा क्राईम ब्राँचने अजून एका बारवर धाड टाकली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही बार मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एकीकडे मानपाडा पोलिसांचा याकडे कानाडोळा झाला असताना क्राईम ब्राँचच्या लागोपाठ सुरू असलेल्या धाडसत्रामुळे लेडीज सर्व्हिस बार हे क्राईम ब्राँचच्या रडारवर असल्याचं दिसून येतं.
काही दिवसांपूर्वी कल्याण पुर्वेतील मोनालीसा बार येथे कारवाई करत 56 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. ग्राहकांना सर्व्हिस देण्याकरता तोकड्या कपड्यातील महिला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील कृत्य व हावभाव करत असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेला मिळाली.त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. ही घटना ताजी असताना पुन्हा 15 सप्टेंबर रोजी लोटस बार अँड रेस्टॉरंटवर क्राईम ब्राँचनं धाड टाकली आहे. या कारवाई दरम्यान 10 महिला व 19 ग्राहकांना ताब्यात घेण्यात आलं असून सुमारे 25 हजरांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. मानपाडा रोडवर असलेल्या या बारचे मालक व चालक दोघेही विना नोकरनामा व परवाना नसताना बारमध्ये ग्राहकांना लेडीज सर्व्हिस देऊन आकर्षित करत आहेत तसेच महिलांना तोकडे कपडे परिधान करून अश्लिल कृती व हावभाव केले जात असल्याची खात्रीपूर्वक माहिती क्राईम ब्राँचला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर ही धाड टाकण्यात आली आहे. तसेच गाणी वाजवण्याकरता असलेला मिक्सर , एम्प्लिफायरही जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे लेडीज सर्व्हिस बारच्या नावाखाली छमछम व इतर अनैतिक धंदे सुरू असल्याचं पुन्हा एकदा उघड झाल आहे.
विशेष बाब म्हणजे कारवाई करण्यात आलेले दोन्ही बार मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केल जात आहे. आगामी काळात तरी आपल्या हद्दीत सुरू असलेल्या छमछमचा आवाज मानपाडा पोलिसांना ऐकू येईल का? हाच प्रश्न आहे. दरम्यान 15 सप्टेंबरला बारवर कारवाई करण्यात आली या वृत्ताला कल्याण क्राईम ब्राँचनही दुजोरा दिला आहे.