प्रशांत माने, डोंबिवली: संजय सखाराम भोईर (वय ४३) या प्रॉपर्टी ब्रोकरची हत्या, सुपारी दिल्याच्या संशयातून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मानपाडा पोलिसांनी ३६ तासात या हत्येचा उलगडा केला असून आरोपी विकास श्याम पाटील ( वय ३८) याला अटक केली आहे. जुन्या जमिनीच्या वादातून आपला काटा काढला जाणार असा संशय विकासला होता त्यातून त्याने साथीदाराच्या मदतीने संजयची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.
जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात ब्रोकरचे काम करणाऱ्या संजय भोईर यांचा मृतदेह शुक्रवारी रात्री उंबार्ली गावाजवळील मामाश्री ढाब्याच्या पाठीमागच्या रस्त्यावर आढळला होता. त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले गेले होते. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासकामी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी तीन पथक नेमले होते.
दरम्यान, या हत्येचा उलगडा करण्यात मानपाडा पोलिसांना यश आले आहे. आरोपी विकास हा रिक्षाचालक असून मयत संजय भोईर आणि विकास यांच्यात एका जमिनीच्या मालकी हक्कावरून खूप वर्षांपासून वाद सुरू होता. या वादातून भोईर यांनी आपल्याला जीवे ठार मारण्यासाठी सुपारी दिल्याचा संशय विकासला होता व या संशयातून विकासने आपल्या एका साथीदारासह भोईरची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे.