डोंबिवली: पश्चिमेतील एका भूखंडाच्या खरेदीवरून झालेल्या वादात विष्णुनगर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. यात केडीएमसीचे माजी नगरसेवक रणजित जोशी आणि त्यांच्या सहका-यांनी दमदाटी आणि शिवीगाळी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान सुरेश देशपांडे आणि त्यांच्या मुलानेच अरेरावी आणि उध्दट भाषा वापरल्याचे सांगत जोशी यांनी दमदाटीचा आरोप फेटाळला आहे. सर्वप्रथम आम्हीच पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
पश्चिमेतील शास्त्रीनगरमधील देवी चौक परिसरात प्रभात को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी आहे. रणजित जोशी, संदीप परब आणि अन्य त्यांचे तीन सहकारी सोमवारी संध्याकाळी पाच वाजता त्याठिकाणी गेले आणि सोसायटीतील प्लॉट नंबर 38 हा आम्ही विकत घेतला आहे असे सांगितले. त्याला सोसायटीचे चेअरमन सुरेश देशपांडे यांनी हरकत घेतली. संबंधित प्लॉट हा कलेक्टर यांच्याकडून सोसायटीच्या नावावर विकत घेतल्याचे सांगत देशपांडे यांनी जोशी यांच्याकडे प्लॉटची कागदपत्रे मागितली. याचा राग आल्याने जोशी यांनी तुम्हाला बघून घेतो, पुढच्या वेळी येतो तुम्हाला दाखवतो अशी दमदाटी करून शिवीगाळी केल्याची तक्रार देशपांडे यांनी पोलिस ठाण्यात केली आहे.
दरम्यान एका विकासकाने तो प्लॉट घेतला आहे. तो प्लॉट विकसित करण्याआधी त्याठिकाणी बोर्ड लावण्यात आला होता. परंतू सोसायटीचे चेअरमन देशपांडे यांनी तो बोर्ड काढून टाकला. त्याबाबत विचारणा केली असता देशपांडे यांच्याकडूनच आम्हाला अरेरावी आणि उध्दट भाषा वापरण्यात आल्याचे जोशी यांचे म्हणणे आहे. आम्हीच पहिल्यांदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानंतर देशपांडे यांच्याकडून खोटी तक्रार दाखल करून बदनामी करण्यात आल्याकडेही जोशी यांनी लक्ष वेधले. केडीएमसीचे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक असलेले जोशी हे 2015 पासून भाजपमध्ये आहेत. त्यांची पत्नी भाजपची माजी नगरसेविका आहे.